Pune : देशातील सर्व सहकारी साखर कारखान्यांचे गुणवत्ता, ऊस गाळप, साखर उतारा यावर आधारित मूल्यमापन करून उत्तम कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना राष्ट्रीय पातळीवर गौरवण्यात येते. यंदा विविध क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या २५ सहकारी साखर कारखान्याचा गौरव करण्यात आला आहे. यामध्ये देशातील सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना म्हणून पुण्यातील कारखान्याची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते. यामध्ये यंदा उत्तर प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तराखंड या राज्यातील १०३ कारखान्यांनी सहभाग घेतला होता.
या पारितोषकामध्ये ऊस उत्पादकता, तांत्रिक कार्यक्षमता, वित्तीय व्यवस्थापन, ऊस गाळप, साखर उतारा, अत्युत्कृष्ट सहकारी आणि भारतातील सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना असे वेगवेगळे भाग करण्यात आले होते. यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कारखान्यांना पुरस्कार देण्यात आले आहेत.
यंदाच्या वर्षाचे संपूर्ण देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठीचे मानाचे वसंतदादा पाटील पारितोषिक भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि, दत्तात्रयनगर, ता. आंबेगाव, जि. पुणे (महाराष्ट्र) यांना मिळाले असून हा जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.
सहभागी झालेल्या सर्व राज्यातील साखर कारखान्यांचा विचार केला तर एकूण २५ पारितोषिकात महाराष्ट्राने १० पारितोषिके मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला असून दुसऱ्या क्रमांकावरील तमिळनाडूला ५ पारितोषिके प्राप्त झाली आहेत. उत्तर प्रदेशने ४, पारितोषिकांसह तिसरा क्रमांक, गुजरातने ३ पारितोषिकात सह चौथा क्रमांक मिळवला असून पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश राज्यांना प्रत्येकी एक पारितोषिक मिळाले आहे.