दुध उत्पादक शेतकऱ्याला लिटरमागे ३४ रुपये दर मिळावा अशी आमची इच्छा आहे. राज्यात खासगी दूध संघाकडून दरातील पळवाटा शोधण्याचा डाव खेळला जात असल्याची परिस्थिती असल्याचे वक्तव्य महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
राळेगणसिद्धी येथे माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी दूधाचे दर आणि नगर जिल्ह्यातील शेळी मेंढी प्रकल्पाचीही माहिती दिली.
राज्य सरकारने निश्चित केलेल्या ३४ रुपये लीटरचा भाव देताना दूध संघ कुचराई करतात.एसएनएफचा मुद्दा पुढे करून खासगी संस्था शेतकऱ्यांचे पैसे कमी करत असून हे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.अशा संस्थांवर कारवाईचे आदेश सचिवांना दिले असल्याचेही विखे पाटील म्हणाले.
राज्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. मात्र, अजूनही सर्वच जिल्ह्यात चांगला पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत करता येईल, यावर सरकार विचार करत असल्याचे वक्तव्य विखे पाटील यांनी केले. पुणे, नगर सोलापूर जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे,असेही ते म्हणाले.