Onion Cold Storage : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता भाभा अनुसंशोधन केंद्र म्हणजेच BARCच्या माध्यमातून साठवणूक करण्यासाठी 250 टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज उभारलं आहे. या कोल्ड स्टोरेजमध्ये शेतकऱ्यांना कांदा मोफत साठवता येणार आहे. कांदा चाळीच्या तुलनेत इथे साठवलेला कांदा दोन वर्षांपर्यंत टिकेल, असा दावा BARC कडून करण्यात आला आहे.
लासलगाव येथील कृषी उत्पादन संरक्षण अणू भाभा संशोधन केंद्रातील 250 टन क्षमता असलेल्या कोल्ड स्टोरेज चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी याठिकाणी विकिरण प्रक्रिया केलेला कांदा कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवल्यास दोन वर्षापर्यंत टिकू शकतो असे दावा करण्यात आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कृषी उत्पादन संरक्षण अणू भाभा संशोधन केंद्र, मुंबई सह सचिव. सुषमा शेटे सहसचिव, जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे उपस्थित होते.
देशात कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये तीन हंगामात कांदा पिक घेतले जात असून एकूण उत्पादनात 50 टक्के कांदा हा नाशिक जिल्ह्यातील असून एकूण 65 लाख मेट्रिक टन उत्पादन घेतले जाते. यात रब्बी चा उन्हाळ कांदा हा साठवणुकीचा कांदा असून 20 लाख मेट्रिक टन साठवणूक क्षमता आहे आणि उर्वरित कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारात येतो आणि त्याचा परिणाम कांदा दरावर होतो. यामुळे लासलगाव येथील कृषी उत्पादन संरक्षण अणू भाभा संशोधन केंद्राच्या वतीने प्रायोगिक तत्वावर 30 टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया करत कांदा नव्याने बांधलेल्या कोल्ड स्टोरेज मध्ये गेल्या सात-आठ महिन्यांपासून ठेवला होता. जसाच्या तसा कांदा असल्याचे यावेळी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवताना दिसून आले.
शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग फायदेशीर
तसेच हा कांदा कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवल्यास दोन वर्षापर्यंत टिकू शकतो, असा दावा केल्यामुळे नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग फायदेशीर असणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विकिरण प्रक्रिया करत कोल्ड स्टोरेजमधील पाच किलो कांद्याची पिशवी भेट देखील देण्यात आली असून याठिकाणी कांदा कोल्ड स्टोरेज मोफत ठेवता येईल. तर यावेळी काही अधिकारी म्हणाले की, कोल्ड स्टोरेजेमध्ये कांदा अधिक सुरक्षित राहत असून अधिक काळापर्यत कांदा आपल्याला टिकवता येतो. तर दुसरे एक अधिकारी म्हणाले कि, सहा महिन्यापासून या ठिकाणी कांदा साठवणूक करण्यात आली आहे. फक्त 5 टक्के नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले जर हाच कांदा चाळीत साठवला असता तर 30 ते 35 टक्के नुकसान झाले असते. तसेच चाळीतील कांदा वेळोवेळी चाळावा लागतो. यातून मजुरी आणि इतर खर्च वाढून जातो. त्यामुळे कोल्ड स्टोरेजचा पर्याय उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले.