खरीप हंगामातील अत्यल्प पावसामुळे यंदा हंगामाला कळ बसली. तशातच महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ममुराबाद येथील कृषी संशोधन केंद्राने संशोधित केलेले 'फुले सुवर्ण' या जातीच्या माध्यमातून 'रब्बी' हंगामात मुगाचे उत्पन्न घेण्याचा प्रयोग केला. सुदैवाने अवकाळी बसरला आणि संशोधनाचा प्रयोग फुलून निघाला. तोही रोगराईमुक्त आणि भरघोस उत्पादनयुक्त. म्हणून येथील केंद्राने विकसित केलेल्या या वाणाला रब्बी हंगामातही राज्यभरात लागवड करता येणार आहे.
फुले सुवर्ण
- ही जात भुरी रोगास प्रतिकारक्षम.
- उभट वाढणारी, न लोळणारी अशी आहे.
- लांब अंतरावर वरच्या भागात शेंगा लागणारी आणि एकाच वेळेस शेंगा पक्वतेला येत असल्याने मशीनद्वारा काढणीस योग्य ठरणारी आहे.
- खरीप हंगामात या जातीपासून सरासरी उत्पन्न दहा क्विंटल प्रतिहेक्टरी मिळते.
अधिक वाचा: हळद पिकातील पूर्वमशागतीचे असे करा व्यवस्थापन
मुगाचे हे वाण आता फुलोऱ्यात असल्याने अपेक्षित उत्पन्न मिळेल, यात शंका नाही. घन पद्धतीने रब्बी हंगामात मुगाची लागवड शून्य मशागत पद्धतीने करावी. या पिकाची हेक्टरी उत्पादन क्षमता वाढवू शकतात आणि कडधान्याच्या पिकाबाबत स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतात. - प्रा. डॉ. सुमेरसिंग राजपूत, कडधान्य पैदासकार व तीळ पैदासकार, तेलबिया संशोधन केंद्र