Join us

कर्नाटकात ऊसाला 3 हजार 773 रुपयांचा विक्रमी दर! महाराष्ट्रात स्थिती काय?

By दत्ता लवांडे | Published: October 11, 2023 5:35 PM

येत्या १ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू होण्याची शक्यता...

येणाऱ्या एक नोव्हेंबर पासून यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. मंत्री समितीची बैठक येत्या आठवड्यात होणार असून त्यामध्ये गळीत हंगामाचा मुहूर्त जाहीर केला जाणार आहे. यंदा कमी पावसामुळे ऊस उत्पादनात घट होणार असल्यामुळे गळीत हंगाम कधी सुरू करावा हे सर्वात मोठे आव्हान मंत्री समिती पुढे असणार आहे. तर दुसरीकडे शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या खात्यात दुसरा हप्ता देण्यासाठी आंदोलन करत आहेत.

दरम्यान, कर्नाटक राज्यातील कारखान्यांनी उसाचा दर जाहीर केला असून तब्बल 27 कारखान्यांनी 3 हजारांपेक्षा जास्तीचा दर जाहीर केला आहे. त्यामध्ये सौंदत्ती तालुक्यातील रेणुका साखर कारखान्याने सर्वाधिक दर प्रतिटन 3773 रुपये जाहीर केला आहे. 

त्या पाठोपाठ चिकोडी तालुक्यातील वेंकटेश्वर कारखान्याने 3693 रुपये दर जाहीर केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या असून महाराष्ट्रातही उसाला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 

मागच्या वर्षीच्या गळीत हंगामाचा विचार केला तर राज्यातील 211 साखर कारखान्यांपैकी फक्त 13 कारखान्यांनी 3000 पेक्षा जास्त दर दिला होता. तर जवळपास 198 साखर कारखान्यांनी 3 हजारांपेक्षा कमी दर शेतकऱ्यांना दिला. तर त्यापैकी 12 साखर कारखान्यांनी दोन हजारापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना दिला. 

कर्नाटक मध्ये उसाचे क्षेत्र तुलनेने महाराष्ट्र पेक्षा कमी असल्याने कारखान्यांची चुरस आहे. त्यातच यावर्षी उसाचे उत्पादनही कमी होणार असल्यामुळे कर्नाटकातील कारखान्यांनी जास्त भाव जाहीर केला असल्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या भागातील ऊस कारखान्यांवरच अवलंबून असतात त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

यंदा शेतकऱ्यांच्या उसाला भाव किती मिळणार?

केंद्र शासनाने काढलेल्या आदेशानुसार शेतकऱ्यांना प्रतिटन 3150 रुपये भाव मिळणार आहे. हा भाव सरासरी उतारा 10.5 टक्क्यासाठी लागू होणार आहे. जर उसाच्या उताऱ्यामध्ये सरासरीपेक्षा वाढ झाली तर प्रती 0.1%  टक्क्याला 30.7 रुपये प्रती टन वाढीव भाव द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर सरासरीपेक्षा उसाचा उतारा कमी आला तर 0.1% टक्क्यासाठी 30.7 रुपये प्रति टन भाव कमी होणार आहे. एकंदरीत कारखान्याचा उतारा 10.5% असेल तरच शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेला 3150 एफआरपी मिळणार आहे. दरम्यान, एफआरपी मधून तोडणी आणि वाहतूक खर्च वजा करून शेतकऱ्यांना ती रक्कम अदा केली जाते.

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेतकरी