Join us

देशभरातील नव्या साखर हंगामाची संथ गतीने सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 1:05 PM

जरी देशभरातील नव्या गाळप हंगामाची सुरुवात थोडी लवकर झालेली असली तरी प्रत्यक्ष ऊस गाळप आणि साखर उत्पादनाची गती गतवर्षीच्या तुलनेत संथ आहे. १५, नोव्हेंबर अखेर देशभरात २६३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु झालेला असून गत वर्षी या तारखेपंर्यत ३१७ कारखाने सुरु झाले होते.

नवी दिल्ली: जरी देशभरातील नव्या गाळप हंगामाची सुरुवात थोडी लवकर झालेली असली तरी प्रत्यक्ष ऊस गाळप आणि साखर उत्पादनाची गती गतवर्षीच्या तुलनेत संथ आहे. १५, नोव्हेंबर अखेर देशभरात २६३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु झालेला असून गत वर्षी या तारखेपंर्यत ३१७ कारखाने सुरु झाले होते. ऊस गाळप १६२ लाख टन झाले असून ते गतवर्षीच्या तुलनेत ८४ लाख टनानी कमी आहे. साहजिकच १२.७५ लाख टनाचे नवे साखर उत्पादन गत वर्षीच्या या तारखेपर्यंत झालेल्या २० लाख टना पेक्षा ७.२५ लाख टनाने कमी आहे. सरासरी साखर उतारा देखिल ०.३५ % ने कमी आहे.

“यंदा उत्तरप्रदेशातील साखर कारखाने पहिल्यांदाच ऑक्टोबर महिन्यात सुरु झाले. मात्र कर्नाटक आणि महाराष्ट्रातील साखर हंगाम १ नोव्हेंबर नंतर सुरु झाला. त्यातच पश्चिम महाराष्ट्रातील ऊस दर आंदोलनाच्या परिणाम स्वरूप हंगाम उद्घाटनाची विधिवत पूजा होऊन देखिल कारखाने पूर्ण क्षमतेने सुरु नाहित” असे राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी म्हटले आहे.

एल निनोच्या प्रभावाच्या परिणाम स्वरूप जो वातावरण बदल झाला आहे, त्यामुळे यंदाच्या वर्षीचे ऊस गाळप व साखर उत्पादन गत वर्षीच्या तुलनेत कमी राहणार आहे. गेल्यावर्षी साखरेचे निवळ उत्पादन ३३९ लाख टन झाले होते. त्या व्यतिरिक्त ४३ लाख टन साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी झाला होता. मात्र यंदाच्या वर्षी ४० लाख टन साखर इथेनॉल निर्मीतीसाठी वळवल्यानंतर साखरेचे उत्पादन २९१ लाख टन इतकेच होण्याचा केंद्र शासनाचा अंदाज आहे.

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या नव्या राष्ट्रीय सहकारी निर्यात संस्थेमार्फत नेपाळ आणि भूतान देशांना ५० हजार टन साखरेच्या निर्यातीचा निर्णय झाला आहे. ही निर्यात पूर्णपणे सहकारी साखर कारखान्यांच्या साखरेची होणार आहे.

साखर हंगाम २०२३-२४ चा राज्यनिहाय गाळप अहवाल

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेतकरीकर्नाटकउत्तर प्रदेशमहाराष्ट्र