सातारा : शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन काढावे, त्यांना शेतीसाठी मदत व्हावी म्हणून बँकांकडूनपीक कर्जपुरवठा करण्यात येतो; पण यामध्ये सातारा जिल्हा बँकेचाच सढळ हात दिसतो; पण खासगी तसेच ग्रामीण बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना कंजुशी करतात. यावर्षीच्या खरिपासाठी आतापर्यंत १ हजार ३९५ कोटींचे वाटप झाले असून, उद्दिष्ट ५५ टक्के साध्य झालेले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी बँकांकडून पीक कर्ज देण्यात येते. यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील; तसेच ग्रामीण बँकांना उद्दिष्ट देण्यात येते. या पीक कर्जातून शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न काढावे, पिकांत नवनवीन प्रयोग करावेत यासाठी हे कर्ज दिले जाते. यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दरवर्षीच शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात आघाडीवर असते. त्या तुलनेत इतर खासगी बँका या मागे पडतात हे समोर आलेले आहे.
आता तर खरीप हंगाम सुरू होऊन दोन महिने होत आले. आताही बळीराजाला पीक कर्ज देण्यात जिल्हा बँकच पुढे आहे. त्यामुळे जिल्हा बँकेप्रमाणेच इतर बँकांनीही बळीराजाला मदत करण्यासाठी एक हात पुढे करावा, अशीच मागणी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांतून होत आले.
कोणत्या बँकेचे किती कर्ज वाटप
- सार्वजनिक क्षेत्रातील बँका : या बँकांना खरीप हंगामासाठी ७३१ कोटी ५० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. या बँकांनी आतापर्यंत ९ हजार ३२२ शेतकऱ्यांन १३९ कोटी ६५ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. उद्दिष्टाच्या अवघे १९ टक्केच हे पीक कर्ज वाटप आहे.
- खासगी क्षेत्रातील बँका : या बँकांना ४०२ कोटी ५० लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत २ हजार ४६ शेतकऱ्यांना ३२ कोटी ६१ लाखांचे वाटप झालेले आहे. उद्दिष्टाच्या अवघे ६ टक्केच हे वाटप झाले आहे.
- ग्रामीण क्षेत्रातील बँका : या बँकांना खरीप हंगामासाठी ३ कोटी ५० लाख पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. आतापर्यंत ३८ शेतकऱ्यांनाच पीक कर्ज देण्यात आलेले आहे. या बँकांनी उद्दिष्टाच्या १९ टक्केच वाटप केले आहे.
खरीप हंगाम उद्दिष्ट २५२० कोटी
खरीप हंगामासाठी सर्वच बँकांना २ हजार ५२० कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. आतापर्यंत सर्व बँकांनी मिळून २ लाख १८ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केलं आहे. या वाटपाची रक्कम १ हजार ३९५ कोटी ५३ लाख आहे. तर उद्दिष्टाच्या ५५ टक्के वाटप झालेले आहे.
जिल्हा बँकेने दिले १२२२ कोटी
- सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट १३८२ कोटी ५० लाखांचे देण्यात आले आहे.
- आतापर्यंत २ लाख ६ हजार ५५८ शेतकऱ्यांना १ हजार २२२ कोटी ५९ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. उद्दिष्टाच्या ८८ टक्के वाटप झालेले आहे.