Join us

राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबाला ५ हजार रुपयांचे अनुदान

By बिभिषण बागल | Published: July 23, 2023 8:27 PM

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीने ५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान व धान्याचे वाटप करा. नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करा, असे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिले.

गेल्या दोन दिवस झालेल्या सततधार पावसामुळे सर्वत्र मोठे नुकसान झाले आहे. शेतपिकांसह घरे, जनावरे, शासकीय मालमत्तेचीही हाणी झाली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीने 5 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान व धान्याचे वाटप करा. नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करा, असे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात श्री.पाटील यांनी जिल्ह्याच्या पुरपरिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पालकमंत्री संजय राठोड, आ.मदन येरावार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक पवन बनसोड, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिह दुबे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात परवा प्रचंड पाऊस झाला. बहुतांश मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेती व घराचे देखील नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वे तातडीने करण्यात यावे. एकही नुकसानग्रस्त सुटणार नाही याची दक्षता घ्या. शेतपिकांचे नुकसान झालेच शिवाय शेतजमिनी देखील खरडून गेल्या, त्याचा स्वतंत्र अहवाल सादर करावा. तातडीची मदत म्हणून शासनाच्या धोरणाप्रमाणे नुकसानग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 5 हजाराचे सानुग्रह अनुदान व धान्य दोन दिवसात वाटप करा. धान्य देत असतांना धान्यासोबत अन्य आवश्यक खाद्य पदार्थाची किट सामाजिक संस्थांच्या मदतीने देता येईल तर तसा प्रयत्न करावा, असे श्री.पाटील म्हणाले.

शेती व शेतपिकांसह शासकीय मालमत्तेचे जे नुकसान झाले आहे, त्याचे देखील सर्वेक्षण करण्यात यावे. या नुकसानीसाठी जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी कसा उपलब्ध करून देता येतील यासाठी प्रयत्न करू. स्थलांतरीत केलेल्या नागरिकांना निवारागृहात भोजनासह आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्या. कृषि, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपआपल्या मालमत्तांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल मदत व पुनर्वसन विभागास सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

अतिक्रमीत जागेवर वास्तव्य करणाऱ्या अनेक गोरगरिबांची घरे पडली आहे. अशा अतिक्रमीत नुकसानग्रस्तांना देखील मदत मिळणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी बैठकीत सांगितले. त्यांना कशी मदत करता येईल यासाठी निश्चितच प्रयत्न करू असे श्री.पाटील यांनी सांगितले. खरडून गेलेल्या जमीनीचा स्वतंत्र अहवाल करावा, असे निर्देश बैठकीत पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. आ.मदन येरावार यांनी यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना सानुग्रह अनुदान लगेच वाटप करणे आवश्यक आहे, असे सांगितले.

सुरुवातीस जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्याच्या पुरपरिस्थितीची माहिती दिली. सततधारमुळे १ हजार ४२६ घरांची पडझड झाली आहे. त्यात अंशत: १ हजार १८९ तर पुर्णत: पडझड झालेल्या २३७ घरांचा समावेश आहे. जवळजवळ २८० नागरिकांना बचाव पथकांद्वारे पुरातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. ६ हजार २७५ नागरिकांना स्थलांतरीत करून तात्पुरत्या निवारागृहात त्यांनी निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. एकून तीन व्यक्तींना मृत्यू झाला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :शेतकरीशेतीपीक