कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतेक सर्वच साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविली आहे. मात्र गाळपासाठी ऊस कमी पडण्याची शक्यता गृहीत धरून साखर कारखाना व्यवस्थापनाने ऊस उत्पादकांसाठी विविध योजनांचे आमिष दाखविण्याचे नियोजन करीत आहेत. वारणा सहकारी साखर कारखान्याने मार्चमध्ये ऊस पुरवठा करणाऱ्या भाग्यवंत शेतकऱ्यांना बुलेट, परदेशवारीची संधी मिळणार आहे. त्यामुळे किमान यंदातरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी उसाचे मार्केटिंग करण्यासाठी तग धरण्याची गरज आहे.
राज्यात कोल्हापूर जिल्हा ऊस पिकाचे एकरी विक्रमी टनेजसह दर्जेदार उत्पादन घेण्यात आघाडीवर आहे. उसाचे क्षेत्र मुबलक असल्याने सहकारी तसेच खासगी साखर कारखानेही मोठ्या प्रमाणात आहेत. मुबलक पाणी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन जास्तीत जास्त उत्पादनासाठी येथील शेतकऱ्यांची कष्टाची तयारी यामुळे एकरी ८० ते १३० टनचा उतारा घेतला जातो. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत जावा, गाळप क्षमता वाढावी यासाठी जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविली. मात्र, यंदा अवकाळी पावसाचा घूमजाव कडक उन्हाळा, पावसाळ्यातही अत्यल्प पाऊस यामुळे बागायती क्षेत्रातील ऊस उत्पादनात कमालीची घट आली. तर जिरायती क्षेत्रावरील उसाचे पीक वाळून गेले. परिणामी सरासरी ऊस उत्पादन घटले आहे. साखर कारखाना किमान पाच महिने तरी चालावा, शेतकऱ्यांनी क्रमपाळीची वाट पाहावी यासाठी साखर कारखानदाराकडून शेतकऱ्यांना विविध बक्षिसांच्या रुपातून आमिषे दाखविण्याचे नियोजन करत आहेत.
वारणा सहकारी साखर कारखान्याने मार्चमध्ये किमान ५० टनाचा ऊस पुरवठा करणाऱ्या पाच भाग्यवान शेतकऱ्याला बुलेट गाडी, गटनिहाय पाच परदेशवारीची संधी मिळणार आहे. नैसर्गिक अवकृपेतही टिकून राहणाऱ्या शेतकऱ्याला अच्छे दिन आले आहेत हे निश्चित.