Join us

मार्ग न काढता कारखाने सुरू करणार तर मैदानात संघर्ष करण्याचा स्वाभिमानीचा इशारा

By भीमगोंड देसाई | Published: November 02, 2023 6:46 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी ४०० रूपये कसे देता येते, हे आकडेमोड करून सांगितले. मात्र कारखानदारांनी पैसे देण्यासंबंधी भूमिका उघड केली नाही. यामुळे शेवटी शेट्टी यांनी शेतकऱ्यांना पैसे न देता कारखाने सुरू कराल तर मैदानात घनघोर संघर्ष होईल, असा इशारा दिला.

कोल्हापूर : गेल्या वर्षाच्या उसाला दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रूपये प्रश्नी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी आयोजित साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक निष्फळ ठरली. कारखानदारांनी बैठकीत किती दर देणार यासंंबंधी चकार शब्द न काढता मौन पाळले. कारखानदारांच्या बाजूने साखर तज्ज्ञ पी. जी. मेढे यांनी पूर्ण बैठकीत ४०० रूपये कसे देता येत नाही, असे पटवून दिले. याउलट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी ४०० रूपये कसे देता येते, हे आकडेमोड करून सांगितले. मात्र कारखानदारांनी पैसे देण्यासंबंधी भूमिका उघड केली नाही. यामुळे शेवटी शेट्टी यांनी शेतकऱ्यांना पैसे न देता कारखाने सुरू कराल तर मैदानात घनघोर संघर्ष होईल, असा इशारा दिला.

चारशे रूपयांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शेट्टी यांनी आक्रोश पदयात्रा काढून वातावरण गरम केले आहे. हंगाम सुरू झाल्याने काही कारखानदार ऊस गाळपासाठी आणण्याचा प्रयत्न करताना कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. म्हणून जिल्हा प्रशासनाने चर्चेतून मार्ग काढण्यासाठी बैठक बोलावली होती. जिल्हाधिकारी राहूल रेखावार अध्यक्षस्थानी होते. जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंंडीत यांची प्रमुख उपस्थिती होती.

आम्ही वाढीव ४०० रुपये कसे देता येतील ह्याचे गणित करून दाखविले व्यवस्थितपणे समजवून सांगितले त्यात इथेनॉलचा अधिकचा नफा आणि शेतकऱ्यांना मिळणारे पैसे यातील तफावत दाखवून दिली. परंतु यात कारखानदारांनी कोणताही दुजोरा दिला नाही आणि आपली भूमिका उघड केली नाही. शेतकऱ्यांना पैसे न देता कारखाने सुरू कराल तर आम्ही मैदानात उतरू असा इशारा दिला. - राजू शेट्टी अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :साखर कारखानेऊसकोल्हापूरशेतकरीराजू शेट्टीजिल्हाधिकारीस्वाभिमानी शेतकरी संघटना