दरीबडची : जत तालुक्यातील विहिरी, कूपनलिका, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. यावर्षी दुष्काळाची दाहकता वाढली आहे. पूर्व भागातील ७० टक्के द्राक्षबागांची खरड छाटणी पाणी उपलब्ध नसल्याने रखडल्या आहेत.
यावर्षी द्राक्ष उत्पादनच होणार नसल्याने बागायतदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. पाण्याअभावी द्राक्षबागा काढून टाकाव्या लागणार असल्याने चिंताग्रस्त बनला आहे.
जत तालुक्यात निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. उमदी, सिद्धनाथ, संख परिसरातील दर्जेदार हिरव्या व पिवळ्या, सुट्या खाण बेदाणाची निर्मिती केली जाते. सध्या तालुक्यातील ७३ गावे व त्याखालील ५३३ वाड्या-वस्त्यांवर ८४ टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.
पूर्व भागातील सर्व तलाव पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. पातळी ९०० ते ११०० फुटापर्यंत खाली गेले आहे. विहिरी कूपनलिका खोदल्या तरीसुद्धा पाणी लागत नाही. मे महिन्यात मान्सनपर्व पाऊस झाला नसल्याने बागायतदार शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सध्या काही शेतकरी द्राक्ष बागांना टँकरने पाणी घालत आहेत. परंतु टँकर भरण्याला सुद्धा पाणी मिळत नाही. बागांची खरड छाटणी होऊन मे महिन्यात काडी तयार करावी लागते पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही तर काडी अपरिपक्व तयार होते.
त्याच्या गर्भधारणेवर परिणाम होणार आहे. यामुळे उत्पादन घटणार आहे. चार महिन्यापासून बागांना पाणी टंचाई आहे. टँकर दरात वाढ झाली आहे. २४ हजार लिटर टँकरचा दर ८ हजार ५०० रुपये आहे. त्यामुळे टँकरने पाणी घालून बागा जगविणे परवडणारे नाही.
कर्जाची परतफेड कशी होणार उत्पादन होणार नसल्याने बागायतदार शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. बागा जळून जाणार आहेत द्राक्षबागेवर काढलेल्या सोसायटी बँकाच्या व खासगी कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न आ वासून उभा आहे.
मजुरांना रोजगार नाहीद्राक्ष काढणी, बेदाणा शेडला टाकणे झाडणे, खरड छाटणी करणे, खुडा काढणे, पेस्ट लावणे व इतर कामांसाठी मजुरांची आवश्यकता असते. मजुरांना रोजगाराची संधी मिळते. या शेतीकामापेक्षा मजुरीही जास्त मिळते. खरड छाटणी झाली नसल्याने मजुरांना रोजगार नाही.
कधी करावी लागते खरड छाटणी?पुढील वर्षीच्या दर्जेदार व वजनदार द्राक्ष उत्पादनासाठी खरड छाटणी महत्त्वाची असते. खरड छाटणीपूर्वी नियोजनही महत्त्वाचे असते. आम्ही साधारणपणे पुढील प्रकारे नियोजन करतो. बाग उशिरा (१५ एप्रिलनंतर) खाली झाल्यास विसाव्याकरिता कालावधी उपलब्ध राहत नाही. अशा वेळी बागेमध्ये छाटणीचा निर्णय लवकर घ्यावा लागतो. किमान चार ते पाच दिवस तरी विसावा द्यावा; कारण २५ एप्रिलनंतर किवा मेमध्ये खरड छाटणी केल्यास व पावसाळा वेळेवर (७ जूनला) सुरू झाल्यास मालकाडी तयार होण्यात अडचणी येतात. खरड छाटणीचा योग्य कालावधी म्हणजे २५ मार्च ते ५ एप्रिल. तरी १५ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत केलेल्या खरड छाटणीत मालकाडी तयार होण्यात विशेष अडचण येत नाही. मात्र १५ एप्रिलनंतर केलेल्या खरड छाटणीत पाऊस लवकर आला, तर रोगांचे प्रमाण वाढते.
पाण्याअभावी खरड छाटणी झालेल्या नाही. १५ दिवसांत पाऊस नाही झाला तर बाग काढून टाकणार आहे. शासनाने दुष्काळी सवलती देऊन कर्जमाफी करावी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करावे. अशी आमची मागणी आहे. - अमोगबसिद्ध शेंडगे, द्राक्ष बागायतदार, दरीबडची
अधिक वाचा: सेवानिवृत्त अभियंत्याची जिद्द खडकाळ व पडीक जमिनीवर पिकवलं ड्रॅगन फ्रूट