शुक्रवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह काही भागात पावसाने हजेरी लावली. तेवढ्यात वीज पडून मोठा कडकडाट झाला. अमोलक जैन संस्थेच्या परिसरात ५० वर्षांपूर्वी खोदलेल्या कोरड्याठाक विहिरीत वीज कोसळली होती. परिसरातील नागरिकांनी काही वेळाने विहिरीत डोकावून पाहिले असता दीड परस पाणी आल्याचे आढळले.
आष्टी तालुक्यातील कडा परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरू झाला. पावसाने थोड्याफार प्रमाणात हजेरीही लावली. यावेळी घराकडे जाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असतानाच विजेचा मोठा कडकडाट झाला. अमोलक जैन शिक्षण संस्थेच्या परिसरात असलेल्या ८ परस विहिरीत ही वीज कोसळली होती. अवघ्या काही वेळात दैवी चमत्कार व्हावा तसा प्रकार घडला.
उन्हाचा कडाका वाढला असतानाही कोरड्या पडलेल्या विहिरीला दीड परसाच्या वर पाणी आले. विहिरीतील पाणी पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. कडा येथील अमोलक जैन संस्थेच्या परिसरात कोरड्या विहिरीत शुक्रवारी वीज कोसळल्यानंतर दीड परस पाणी आल्याने कुतूहल निर्माण झाले आहे.
पाणी कायमस्वरूपी टिकत नाही
वीज पडल्यानंतर ती जमिनीतून पास होत असते. यावेळी जमिनीतील पाण्याचे स्त्रोत थोड्याफार प्रमाणात मोकळे होत असतात. यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत. मात्र, हे पाणी कायमस्वरूपी टिकत नाही. दोन-तीन वेळा उपसा झाल्यानंतर पाणी जाते. -रोहन पवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक, बीड
नांदेड शहरात रिमझिम पाऊस
नांदेड : गेल्या काही दिवसांपासून नांदेडचा पारा ४० अंशावर गेला आहे. त्यामुळे नागरिक घामाघुम होत आहेत. त्यातच शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडे सहा वाजेनंतर विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस झाला, गेल्या काही दिवसात सातत्याने तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर तुरळक गर्दी दिसून येत आहे. सात वाजेनंतरही गरम वारे असह्य करुन सोडत आहेत. त्यातच शनिवारी ढगाळ वातावरणानंतर रिमझिम पावसामुळे उकाड्यात वाढ झाली होती.
परभणीत मेघगर्जनेसह हजेरी
परभणी : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी पूर्णा तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. शनिवारी जिल्ह्यात परभणी, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ, जिंतूर, मानवत तालुक्यातील काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. दहा ते पंधरा मिनिटे पाऊस झाला. परिणामी काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दुसरीकडे मात्र, शेतकऱ्यांना पावसामुळे धावपळ करावी लागली. परभणी शहरात रात्री ९ वाजेच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
हिंगोलीत दुसऱ्या दिवशीही पाऊस
हिंगोली : जिल्ह्यातील काही भागात सलग दुसऱ्या दिवशी ३० मार्च रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हळद उत्पादकांची तारांबळ उडाली होती.
मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, उकाड्यात वाढ झाली आहे. त्यातच २९ मार्च रोजी वसमत व कळमनुरी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वसमत शहरासह तालुक्यातील कौंठा, हयातनगर, कुरूंदा परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या.
तसेच कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा परिसरात सुमारे अर्धातास पाऊस झाला. तसेच जवळा पांचाळ, रामेश्वर तांडा, दांडेगाव, डिग्रस, वडगाव, रेडगाव, बोथी, कोपरवाडी, वारंगा फाटा परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. हळद भिजल्याने नुकसान झाले. तर बाजारपेठेतही तारांबळ उडाली होती.
वीज पडून ऊसतोड मजूर, वृद्ध महिला ठार
• आष्टी : शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यावेळी शेतात ऊसतोडणी करत असताना अंगावर वीज पडून मजूर ठार झाला. तसेच शेतातील झाडाखाली थांबलेल्या वृद्ध महिलेचाही अंगावर वीज पडून मृत्यू झाला. या दोन्ही घटना शुक्रवारी सायंकाळी आष्टी तालुक्यात घडल्या.
• आष्टी तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर ऊसतोडीची कामे सुरू आहेत. ऊसतोडीसाठी जळगाव जिल्ह्यातील अनेक टोळ्या आष्टी तालुक्यामध्ये दाखल झाल्या आहेत. रुईनालकोल येथील दादासाहेब बनसोडे यांच्या शेतात सध्या ऊसतोडणी सुरू आहे.
शुक्रवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू झाला,यावेळी आनंद सुरेश सोनवणे (वय २२. रा. नांद खुर्द, जि. जळगाव) हा ऊसतोड मजूर बनसोडे यांच्या शेतात तोडणी करत असताना अंगावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला. हनुमंतगाव येथील शांताबाई बापू खेमगर (वय ६२) या शेतात गहू गोळा करत असताना अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला.