शिरीष शिंदे
वर्ष २०२३ खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाह्य मंजूर करण्यात आले आहे. सदरील लाभ देण्यासाठी बीड जिल्हा कृषी विभागाने ८ लाख २६ हजार शेतकऱ्यांपैकी ५ लाख ९१ हजार शेतकऱ्यांचे आधार संलग्न खाते व अन्य विवरण घेऊन ते ऑनलाइन केले असून, या कामात बीड जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.
जिल्हा स्तरावर सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. वर्ष २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १ हजार रुपये, तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रतिहेक्टर रुपये पाच हजार (दोन हेक्टरच्या मर्यादित) अर्थसाह्य मंजूर करण्यात आले आहे.
यामध्ये संपूर्ण राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी १५४८ कोटी रुपये, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी २६४६ कोटी रुपये असे एकूण ४१९४ कोटी रुपये अर्थसाह्य मंजूर करण्यात आले आहे.
खरीप हंगाम २०२३ च्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थसाह्य देण्याबाबतची कार्यपद्धती ३० ऑगस्ट रोजी शासनाने जाहीर केली आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसाह्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या साहाय्याने कृषी विभागाने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना लवकरात लवकर अर्थसाह्य वाटप सुरू करण्यात यावे, असे निर्देश कृषिमंत्री मुंडे यांनी दिले होते. त्यानंतर बीडसह राज्यातील शेतकऱ्यांच्या आधार संलग्नीकरणाचे काम सुरू झाले.
मागील वर्षी नैसर्गिक असमतोलामुळे राज्यभरातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात, तर दुष्काळानंतर भाव पडल्याने विक्रीमध्ये असे नुकसान झाले होते. त्यावर उपाय म्हणून लोकसभा निवडणूक लागण्याच्या अगोदरच धनंजय मुंडे यांनी वर्ष २०२३ च्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती.
त्यानुसार नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान, बीड राज्यात अव्वल आल्याने स्वागत होत आहे.
रुजू होताच लागले कामाला
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर हे काही दिवसांपासून सुटीवर होते. ६ सप्टेंबर रोजी रुजू होताच कृषी अधीक्षकांनी बैठक घेत शेतकऱ्यांचे आधार संलग्नीकरण करण्यास प्राधान्य दिले. परिणामी, कमी कालावधीत बीड जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे.
ज्या शेतकऱ्यांचे सामायिक खाते असेल त्यांनी एकास प्राधिकृत करून ॲफिडेव्हिट दाखल करावे. तसेच जे कोणी शेतकरी बाहेर गावी असतील त्यांनी वेळ काढून कृषी सहायकांकडे आधार कार्ड लिंक असलेले खाते क्रमांक व इतर आवश्यक कागदपत्रे द्यावीत. - बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
क्षेत्रानुसार प्रत्येक शेतकऱ्यास मिळणार अशा प्रकारे निधी
■ प्रत्येक शेतकऱ्यास त्याच्या क्षेत्राच्या नुकसानीनुसार संबंधित रक्कम मिळणार आहे.
■ ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १ हजार रुपये, तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रतिहेक्टर रुपये पाच हजार (दोन हेक्टरच्या मर्यादित) अर्थसाह्य मंजूर करण्यात आले आहे.
■ प्रत्येकास जवळपास २० हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे.
अशी आहे आधार संलग्नीकरण स्थिती
तालुका | टक्के (%) | शेतकरी उद्दिष्ट | पूर्ण संख्या |
अंबाजोगाई | ८१.४३ | ७९४६३ | ६४७१५ |
आष्टी | ७२.३४ | ६४७१५ | ४६४४६ |
बीड | ६८.३४ | १२९९६६ | ८८८२४ |
धारूर | ७२.६५ | ४८२०७ | ३५०२० |
गेवराई | ६०.६१ | १०४७५० | ६३४८७ |
केज | ७४.८६ | १२१०१९ | ९०५९४ |
माजलगाव | ७२.८२ | ५२४३६ | ३८१८४ |
परळी | ८२.२६ | ६६५९० | ५४७७७ |
पाटोदा | ६५.५३ | ७१०७१ | ४६५७१ |
शिरूर | ६३.२९ | ६२४४८ | ३९५२३ |
वडवणी | ८५.१२ | २७९५३ | २३७९५ |
एकुण | - | ८२८११९ | ५९१९३६ |