Join us

Aale Lagwad : यंदा आल्याची लागवड मोठ्या प्रमाणात पण दराचं गणित जुळणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 16:09 IST

गेली काही वर्षात आले पिकाचे माहेर अशी ओळख तयार झालेल्या इंदोरी गावात जवळपास तीनशे एकर क्षेत्रात आले पीक लागवड झाली. मात्र, आल्याचे बाजारभाव कमालीचे घटल्याने उत्पादकांनी धसका घेतला आहे.

हेमंत आवारीअकोले : गेली काही वर्षात आले पिकाचे माहेर अशी ओळख तयार झालेल्या इंदोरी गावात जवळपास तीनशे एकर क्षेत्रात आले पीक लागवड झाली. मात्र, आल्याचे बाजारभाव कमालीचे घटल्याने उत्पादकांनी धसका घेतला असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आसू दाटल्याचे चित्र आहे.

साधारण उत्पादन खर्च एकरी अडीच लाख आणि बाजारभाव २० रुपये प्रति किलोपेक्षा कमी उत्पन्न आदमासे १२ ते १४ टन. मग शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार? चालू बाजारभाव १७ ते २० रुपये प्रति किलो असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पीक राखून खोडवा घ्यायचा म्हटले तर उण्णीचा प्रादुर्भाव व वाढणारे महिने तसेच बाजारभाव वाढतील याची खात्री नाही. म्हणून मिळेल त्या भावात आले विकावे लागत आहे.

इंदोरीत तीनशेहून अधिक एकर क्षेत्रावर आले पीक लागवड आहे. उसाला आले पिकाने मागे टाकले आहे. १९८० पासून फणभर जिरायती क्षेत्र नसलेल्या बागायतदार इंदोरीत ऊस क्षेत्र कमालीचे घटले आहे. त्याची जागा आले पिकाने घेतली आहे.

साधारण २२ वर्षांपूर्वीच इंदोरीत कन्नड फुलांब्री भागातून वाणुळा म्हणून आले पीक आले. तेव्हा लोकमतने 'आले इंदोरीत आले' मथळ्यात बातमी प्रसिद्ध केली होती.

आता आले हे इंदोरीत प्रमुख पीक दिसू लागले असून, इंदोरी परिसरातील उंचखडक बुद्रुक, आंबड, रुंभोडी, औरंगपूर, मेहेंदुरी या गावांमध्येदेखील आले पीक बहुतांश नजरेस पडत आहे.

चार-पाच वर्षात आले पिकाचे बाजारभाव बरे होते. उत्पन्नदेखील चांगले मिळायचे. यावेळी शेतकऱ्यांनी १०० ते १०५ रुपये प्रति किलोने बियाणे घेतले. एकरभर लागवड करायला टनभर बियाणे लागते.

लाख सव्वा लाखाचे बियाणे, शेत मशागत, वावर बांधणी, सरी पाडणे, लागवड, ठिबक, मल्चिंग, शेणखत, रासायनिक व सेंद्रिय खते, औषधे याचा खर्च एकरी दीड लाख रुपयांपर्यंत जातो. ८ ते ९ महिने पीक निघायला लागतात. 

१ टनाला ४०० रुपये मजुरीशिरपूर-साक्री-धुळे आदिवासी भागातील मजूर कुटुंबकबिल्यासह इंदोरी- उंचखडक शिवारात आले पीक काढण्यासाठी आले आहेत. आले काढणी मजुरी ४०० रुपये टन असून ही मजुरी व्यापारी देतो. आले धुऊन स्वच्छ करून द्यावे लागते.

यंदा आले बेणे शंभर रुपये किलोने घ्यावे लागल्याने खर्च वाढला. एकरी सरासरी १४ टनपर्यंत उत्पादन निघते. २० रुपये भाव मिळत असल्याने यंदा उत्पादक अडचणीत आले आहेत. - रविराम देशमुख, शेतकरी

पूर्वी एकरी २०-२१ टन उत्पादन व्हायचे. बेणे स्वस्त मिळायचे मग कमी भाव मिळाला तरी परवडत होते. किमान ५० ते ६० रुपये भाव मिळाले तर आले पीक इंदोरी परिसरात तग धरेल. नाहीतर शेतकरी पिकावर नांगर फिरवतील. - लक्ष्मण येवले, शेतकरी

यंदा प्रथमच सव्वा एकर आले लावले. तीन लाख खर्च आला. अवेळी पावसामुळे उत्पादन घटणार यात शंका नाही. किमान ३० ते ४० रुपये भाव मिळाले तरच परवडेल. - तानाजी भोसले, शेतकरी

यंदा उत्पन्न घटले आणि बाजारभाव कमी झालेत. बियाणे कमी भावात मिळाले तर उसापेक्षा परवडते. यंदा आल्यापेक्षा ऊस बरा, असे म्हणायची वेळ आली. - अशोक पाटील नवले, शेतकरी

टॅग्स :शेतीपीकशेतकरीबाजारमार्केट यार्डकाढणी