Join us

Video : टक्केवारी, गैरव्यवहार अन् निघून गेलेल्या पणनमंत्र्यांविरोधात संताप; सभापती म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 7:10 PM

Abdull sattar Pune Video : राज्यभरातील बाजार समित्यांची परिषद पुण्यात आयोजित केली होती. त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी काढता पाय घेतल्याने गोंधळ निर्माण झाला.

Pune : "खासगी मार्केट यार्डांना परवानगी दिल्यामुळे क आणि ड वर्गातील मार्केट कमिट्या डबघाईस आल्या आहेत. सहा-सहा महिने कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाहीत. त्यांचे नियंत्रण डीडीआरकडे असते, या सर्व समस्या ऐकून घेण्याऐवजी पणनमंत्री पळून गेले. हे टक्केवारी घेणारे मंत्री आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे नाही तर टक्केवारी घेण्याची कॅबिनेट बैठक महत्त्वाची आहे" असे गंभीर आरोप बाजार समित्यांच्या सभापतींनी पणनमंत्री अब्दुल सत्तारांवर केले आहेत. पुण्यात बाजार समिती परिषदेमधून पणनमंत्री निघून गेल्यावर संतापलेल्या सभापतींनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

काल पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात राज्यभरातील बाजार समित्यांची परिषद आयोजित केली होती. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांचे भाषण थांबवून अब्दुल सत्तार यांनी पुढच्या व्यक्तीला भाषणासाठी बोलावले. त्यानंतर मला बैठकीला जायचे असे सांगून बाजार समित्यांचे प्रश्न ऐकून न घेताच पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी या कार्यक्रमातून काढता पाय घेतला. यावेळी राज्यभरातून आलेल्या प्रत्येक बाजार समित्यांच्या सभापतींनी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

राज्यभरातील बाजार समित्यांचे प्रतिनिधी आज इथे उपस्थित होते. हे प्रतिनिधी ज्या त्या भागातील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन प्रतिनिधी आले असताना अब्दुल सत्तार मात्र टक्केवारी घेण्याच्या कार्यक्रमासाठी निघून गेले. अब्दुल सत्तार यांनी आज सकाळपासून पुणे बाजार समितीच्या सुनावणीसाठी वेळ घातला पण त्यांना परिषदेला यायला वेळ नव्हता असा आरोप महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी संघाचे उपाध्यक्ष संतोष सोमवंशी यांनी केला आहे. 

राज्यभरातून जे १२-१ चे प्रस्ताव पणन संचालकांकडे येतात त्यातून मोठे गैरव्यवहार होतात असा गंभीर आरोपही सभापती प्रविणकुमार नहाटा यांनी केला आहे.  

आमच्या रास्त मागण्या घेऊन आम्ही इथे आलो होतो. आमचे काही लोकं हॉस्पिटल सोडून आले होते. आम्ही ज्या मागण्या घेऊन आलो होतो त्या मागण्या आमच्या वैयक्तिक नव्हत्या. पण या सरकारची विनाशकाली विपरीत बुद्धी अशी अवस्था झाली आहे. सत्तार यांनी सांगितलं की, ही आमची शेवटची कॅबिनेट बैठक आहे. देव करो ही त्यांची शेवटचीच कॅबिनेट बैठक ठरो. - निकांथ मिरकाळे (सभापती, चाकूर बाजार समिती)

मी माझ्या भाषणात राज्यभरातील विविध बाजार समित्यांचे प्रश्न मांडत होतो. ज्या प्रश्नावरून बाजार समित्या वैतागल्या आहेत असे प्रश्न मांडत असताना पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी मला रोखले आणि ते पळून गेले. पळून जात असताना मी कॅबिनेट बैठकीला जात असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. पण ते आता कोणत्याच कॅबिनेटमध्ये दिसणार नाहीत. - संतोष सोमवंशी (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी संघ)

 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड