सहदेव खोतपुनवत : बिऊर (ता. शिराळा) येथील प्रगतिशील शेतकरी अभिजित आकाराम पाटील यांनी आपल्या शेतात लाल कोबीच्या पिकाची लागवड केली आहे. शेतीतल्या या वेगळ्या प्रयोगासह चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
शिराळा तालुक्यातील बिऊर हे गाव भाजीपाला, गवती चहा, तसेच वेगवेगळ्या व्यापारी पिकांसाठी प्रसिद्ध आहे. येथील शेतकरीशेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न करतात.
येथील अभिजित आकाराम पाटील या युवा प्रयोगशील शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून २५ गुंठ्यांत मुंबई व पुणे येथे मागणी असलेल्या लाल कोबी या परदेशी भाजीपाला पिकाची लागवड केली. लाल कोबी पिकाचा शिराळा तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. चांगल्या देखभालीनंतर सध्या हे पीक जोमात आले आहे.
लाल कोबीचे प्रती हेक्टरी १५० ते २०० क्विंटल उत्पादन मिळते. हिरव्या कोबीपेक्षा बाजारात लाल कोबीस दुप्पट भाव मिळतो. ग्रामीण भागात लाल कोबीला अजूनही मागणी नाही, मात्र मुंबई, पुणेसह मोठ्या शहरातील बहुतेक शॉपिंग मॉल्स, मोठी दुकाने, ऑनलाइन मार्केट आणि मोठ्या भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
निश्चितच लाल कोबीला चांगला दर मिळाला, तर याच्या शेतीतून शेतकऱ्यांना हेक्टरी सहा लाखांपर्यंतची कमाई होऊ शकते. लाल कोबी या पिकाची तीन महिन्यांत योग्य ती काळजी घेतली, तर चांगले उत्पन्न मिळते याचा अभ्यास करून अभिजित पाटील यांनी प्रायोगिक तत्त्वावर या पिकाची लागवड केली आहे.
तंत्रज्ञानाची जोड देऊन सेंद्रिय व जिवाणू खताचा वापर करून पिकाचे योग्य नियोजन केले आहे. पिकाच्या संरक्षणासाठी सभोवताली नेट बांधली आहे. आंतरमशागतीची विशेष काळजी घेतली आहे.
शेतकऱ्यांनी प्रामुख्याने युवा शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेती करणे गरजेचे आहे. पुणेसह मोठ्या शहरातील बहुतेक शॉपिंग मॉल्स, मोठी दुकाने, ऑनलाइन मार्केट आणि मोठ्या भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या भाजीपाल्याची शेती करून योग्य नियोजन केले, तर आर्थिक उन्नती व्हायला वेळ लागणार नाही. - अभिजित पाटील, प्रयोगशील शेतकरी, विठ्ठलनगर-बिऊर