Join us

शेती मशागतीच्या कामांना वेग; बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 4:14 PM

मृग नक्षत्रातील पेरणी फायदेशीर...

हवामान विभाग आणि पंचांगकर्ते यांच्या अंदाजानुसार यंदा पाऊसकाळ अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यंदा मृग नक्षत्रात खरीप हंगाम पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी मशागत कामाला गती दिली आहे. महिनाभरावर पेरणी होईल, त्यासाठी खत, बी-बियाणे याच्या खरेदीसाठी आर्थिक जुळवाजुळव शेतकरी करीत आहेत.

चाकूर तालुक्यात खरिपाचे ५० हजार ५०० हेक्टर्स क्षेत्र आहे. तर २६ हजार शेतकरी खातेदार आहेत. पेरणीसाठी शेतीची मशागत कामाला गती आली आहे. गतवर्षीचा दुष्काळाने शेतकऱ्यांच्या पदरी काही एक पडले नाही. गतवर्षी खरीप हंगाम हातचा गेला. रब्बीने साथ दिली नाही. त्यातच दोन्ही हंगामांतील पीकविमा शेतकऱ्यांच्या हाती पडला नाही. त्यामुळे यंदाची खरिपाची पेरणी कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना सातत्याने सतावत आहे. सरकारने जाहीर केलेली अनुदानाची पूर्णपणे रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाही. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत.

यावर्षी मान्सून आगमन वेळेवर होणार असून, जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडणार हा हवामान खात्याचा आणि पंचांगकर्ते यांचा अंदाज असल्याने शेतकरी शेतीच्या मशागतीत गुंतला आहे. तालुक्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीनचा पेरा सर्वाधिक करतात. सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. शेतीची मशागत आता यंत्राच्या साह्याने केली जाते. एकरी १७०० रुपये नांगरणी आहे. त्यातच पाळी करणे, महागडी खते, बी- बियाणे खरेदी करून खरिपाच्या पेरणीचा नंतर खर्च जाता हाती काय पडणार, हा प्रश्न शेतकरी वर्गाला सतावत आहे. सध्या हंगामपूर्व शेती मशागतीची कामे सुरु आहेत.

मृग नक्षत्रातील पेरणी फायदेशीर...

मृग नक्षत्रात पेरणी झाली तर पिके जोमदार येतात. पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत नाही. त्यामुळे विक्रमी धान्याचे उत्पादन होते. पीक आणेवारी ४५ टक्क्यांवर आली होती. पीकविमा मिळणे आवश्यक असतानाही अद्यापपर्यंत पीकविमा शेतकऱ्यांच्या पदरी पडला नाही. गतवर्षी १०० टक्के नुकसान झाले. त्याचे अनुदान आणि पीकविमा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पदरात पडला नाही. खते, बी-बियाणे यांच्या किमतीत भरमसाठ वाढ झालेली असल्याचे शेतकरी अण्णाराव आलमाजी, गणेश भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :शेतीखरीपलातूर