Join us

दुष्काळी अनुदान जमा; खात्यावर मदत आल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 1:09 PM

भोकरदन येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान जमा

तीव्र पाणीटंचाई, दुष्काळ, घरात पडलेला कापूस व सोयाबीनला नसलेला भाव आदी मुद्यांवरून शेतकरी पूर्णपणे भरडला गेलेला असताना तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांवर खरीप २०२४ च्या हंगामातील दुष्काळी अनुदान जमा झाले.

अनुदान हे फक्त ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे. त्यांनाच जमा झाले अशी माहिती आहे; मात्र निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांना बैंक खाते तपासण्याचा विसर पडलेला होता; परंतु ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत त्यांना मात्र हा आनंददायी धक्काच आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बहुतांश गावांतील शेतकऱ्यांना २०२२ पासूनचे दुष्काळी अनुदान रखडले होते. त्यासाठी शेतकरी संघटनांनी व शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदने व आंदोलने देखील केली. ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले त्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर राष्ट्रीयीकृत बँकांकडून होल्ड टाकण्यात आले. होल्ड काढण्यासाठी देखील शेतकऱ्यांना अनेक चकरा माराव्या, असंख्य अडचणी शेतकऱ्यांना सहन कराव्या लागल्या; मात्र शेतकऱ्यांना सरसकट दुष्काळी अनुदान आल्याने दिलासा मिळाला आहे.

केवायसीमुळे रक्कम मिळाली

आमचे एकत्रित कुटुंब आहे. शेतीसोबत इतर पूरक व्यवसाय देखील आहे. यंदा प्रथमच दुष्काळी अनुदान खात्यावर कुठल्याही त्रासाविना जमा झाले. सर्व खाते केवायसी केल्यामुळे आम्हाला रक्कम सहज मिळाली. - अरुण देशमुख, शेतकरी, भोकरदन.

शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड

बहुतांश शेतकऱ्यांना केवायसीसाठी आधार केंद्रांवर जावे लागते. अनेकदा 'केवायसी'च्या नावाने एजंट शेतकऱ्यांची फसवणूक करतात. केवायसीची प्रक्रिया ही सुलभ करण्यात यावी, अशी व्यवस्था करण्यात यावी. - नारायण लोखंडे, अध्यक्ष, बळीराजा फाउंडेशन.

आनंद झाला

यंदा कापसाला भाव नव्हता. अनेक दिवसांपासून कापूस घरात पडून होता; मात्र खरीप हंगामात झालेल्या नुकसानभरपाई म्हणून फुल ना फुलांची पाकळी मिळाल्याचा आनंद झाला आहे. येत्या खरीप हंगामासाठी हा पैसा वापरता येईल. - कल्पना इंगळे, शेतकरी, बाभूळगाव.

हेही वाचा - कापूस लागवड करतांना या गोष्टींची ठेवा जाण; उत्पन्नाची वाढेल हमी पिकांची असेल शान

टॅग्स :दुष्काळशेतकरीसरकारी योजनाशेतीमराठवाडाविदर्भ