कोल्हापूर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नाेव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ११ कारखान्यांनी किती दराने साखर विकली गेली याची माहिती गुरुवारी दिली. महिनानिहाय विकेलेल्या प्रतिक्विंटल साखरेचा दर आणि खुल्या बाजारातील दर याचा तुलनात्मक अभ्यास केला. यामध्ये कारखानदारांनी खुल्या बाजारापेक्षा सरासरी ५० ते ३६३ रुपये कमी दराने साखर विक्री केल्याचे दाखवले. यासाठी पै-पाहुण्यांच्या ट्रेडिंग कंपन्यांच्या माध्यमातून साखर विक्री करून कारखानदारांनी कोट्यवधींची वरकमाई केल्याचा गंभीर आरोप ‘स्वाभिमानी’चे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे गेल्या हंगामातील उसाला ४०० रुपयांचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी आक्रोश पदयात्रा काढली आहे. यादरम्यान संघटनेने जिल्हा बँकेकडे साखर विक्रीची माहिती मागितली होती. ती बँकेने दिली. यावर शेट्टी म्हणाले, बाजारभावापेक्षा कमी दराने साखर विकण्यामागे पैसे हाणणे हाच हेतू आहे. या भानगडी करण्यात बहुतांशी कारखानदारांच्या साखर विक्रीच्या ट्रेडिंग कंपन्या आघाडीवर आहेत.
एका क्विंटलला बाजारभावापेक्षा ३६३ रुपये कमी दराने साखर विकल्याचे दाखविले असेल तर एकेका कारखानदारांनी ऊस उत्पादकांकडून कोट्यवधी रुपयांची वरकमाई केल्याचे जगजाहीर होते. उत्पादकांचे हित पाहण्यासाठी कारखानदारांनी बाजारभावाप्रमाणे साखर विक्री करणे अपेक्षित आहे. असे न करता वरकमाईसाठी कमी दराने साखर विक्री केल्याचे दाखवून ऊसउत्पादकांचे प्रतिटन ४०० रुपयांप्रमाणे पैसे त्यांना बुडवून येणाऱ्या निवडणुकीत वापरायचे असल्याचे स्पष्ट होते; मात्र कारखान्यांनी मार्चअखेर शिल्लक साठ्याचे मूल्याकंन करताना धरलेले दर व ज्या-त्या महिन्यात विकलेल्या साखरेच्या दरातील रकमेतून कारखान्यांकडे पैसे शिल्लक राहत असल्याचे दिसते. उर्वरित माहिती बँकेकडून मिळाल्यानंतर वास्तव समोर येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांना दुसरा हप्ता ४०० रुपये देणे सहज शक्य आहे.
..तर बडे नेते, कारखानदार अडकणार
जो बाजारामध्ये बाजारभाव आहे त्याहीपेक्षा कमी दराने साखर विक्री केली असल्याने ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे या सर्व कारखान्यांतील साखर कोणत्या कंपन्या व व्यापाऱ्यांनी खरेदी केली याची चौकशी केल्यास राज्यातील अनेक बडे नेते व साखर कारखानदार या आर्थिक गैरव्यवहारामध्ये अडकणार आहेत, असाही आरोप शेट्टी यांनी केला.