Join us

लिंकींग करणाऱ्या खत कंपन्यांवर कारवाई, या कंपन्या करतात लिंकींग

By पंकज प्रकाश जोशी | Published: July 25, 2023 5:08 PM

अनेक बड्या खत कंपन्यांची नावे असल्याचे उघडकीस आल्याने लिंकींगला बळी पडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे, तर कंपन्यांमध्ये खळबळ पसरली आहे.

शेतकऱ्यांना खतांची विक्री करताना त्यासोबत अन्य उत्पादनाची लिंकीग करणाऱ्या कंपन्यांना राज्याच्या कृषी विभागाने दणका द्यायला सुरूवात केली असून काही कंपन्यांना नोटीसाही बजावल्या आहेत. विशेष म्हणजे त्यात अनेक बड्या कंपन्यांची नावे असल्याचे उघडकीस आल्याने लिंकींगला बळी पडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे, तर कंपन्यांमध्ये खळबळ पसरली आहे.

मागच्या आठवड्यात माजी कृषीमंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात खतांच्या लिंकींगसह अनेक प्रश्न उपस्थित करून कारवाईची मागणी केली होती. लिंकींगसाठी दस्तुरखुद्द खत कंपन्याच जबाबदार असल्याचे आ. थोरात यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्याने सर्वच आवाक झाले होते. त्यानंतर कृषी मंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार कृषी विभागाने धडक कारवाई सुरू केली असून लिंकींग करणाऱ्या मे. नर्मदा बायोमेक लि, पुणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती कृषी संचालक विकास पाटील (गुणनियंत्रण व निविष्ठा) यांनी ‘लोकमत ॲग्रो’ला दिली आहे.

विधानसभेत पोचली तक्रार

सदर नर्मदा खत कंपनीकडून बाजारात युरिया खतासोबत, एनपीके २०:२०:०:१३(दाणेदार), बायो पोटेश दाणेदार ही खते खरेदी करण्याची शेतक-यांना सक्ती केली जात होती. त्यासाठी खत दुकानदारांवर दबाव टाकला जात होता. यासंदर्भात राज्याच्या कृषी आयुक्तांनी कंपनी प्रतिनिधी सोबत दिनांक ०३/०७/२०२३ रोजी बैठक घेऊन खत कंपन्यांनी लिंकिंग करु नये अशा सक्त सुचना दिल्या होत्या. तरीसुध्दा लिंकींग सुरू राहिल्याच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन पावसाळी अधिवेशनात आ. बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत संबंधित कंपनी युरिया खतासोबत एनपीके २०:२०:०:१३(दाणेदार) बायो पोटेश दाणेदार ही खते खरेदी करण्याची सक्ती करत असल्याचे असे निर्दशनास आणून दिले होते. दरम्यान कृषी आयुक्तालय स्तरावरील तक्रार निवारण कक्षात सुध्दा शेतक-यांच्या खत लिंकींग संदर्भात तक्रारी प्राप्त होत होत्या.

पॉस यंत्रावरही गडबड

याशिवाय आलेली खते ही POS मशीनवर तात्काळ कंपनीकडून नोंदवली जात नसे. त्यामुळे जोपर्यंत आलेली खते ही POS मशिनवर नोंदवली जात नव्हती, तो पर्यंत कृषि विक्रेते युरिया विक्रीस मनाई करत असत.  त्यामुळे शेतकरी बांधव जरी दुकानात खते खरेदी करण्यास आले तरी त्यांना खते असुनही देता येत नसल्याने शेतकऱ्यांच्या रोषाला संबंधित खत विक्रेत्याला सामोरे जावे लागले आहे.

म्हणून कारवाईची नोटीस

या सर्व गोष्टी लक्षात घेता शेतकरी बांधवांना जोड खते न देता जी शेतकरी बांधवाची मागणी आहे त्याप्रमाणे खते द्यावीत याची दक्षता घेण्यात यावी असे आदेश कृषी विभागाने कंपनीला दिले आहेत.  याशिवाय खत नियंत्रण आदेश १९८५ मधील खंड, ४, ५, ८, १९, ३५ , तसेच खत हालचाल नियंत्रण आदेश १९७३ मधील खंड ३ ए चे उल्लंघन केलेले आहे. त्यातून कंपनीने अशा प्रकारे खताचे लिंकींग करून विक्री केल्यामुळे शेतक-यांची फसवणूक करीत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे खत नियंत्रण आदेश १९८५ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होत असल्याचे सांगून ७  दिवसाच्या आत खुलासा करण्याचे व तो न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने संबंधित कंपनीला दिला आहे व तशी कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.

( हे ही वाचा : जळगावच्या शेतकऱ्यांना फसविणाऱ्या सरदार अँग्रो खत कंपनीला दणका

या कंपन्यांचीही नावे समोर

नर्मदा खत कंपनीबरोबरच इफको, कृबको, आरसीएफ यांचीही नावे लिंकींगच्या चर्चेत असून त्यांनाही नोटीस पाठविली असल्याचे कृषी संचालक विकास पाटील यांनी लोकमत ॲग्रोला सांगितले. या कंपन्या युरिया सोबत कुठल्या खतांची लिंकींग करायला लावायच्या त्याची यादी पुढील प्रमाणे असून आवश्यकता  पडल्यास या सर्वांवर कारवाई केली जाण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

कंपनी

मुख्य खत

लिंकींगचे खत

नर्मदा

युरिया

N.P.K.20:20:0:13 (दाणेदार)

नर्मदा बायो

युरिया

बायो पोटॅश (दाणेदार)

आरसीएफ

युरिया

N.P.K.15:15:15 (दाणेदार),

N.P.K.15:15:15(पाण्यात विरघळणारे),

N.P.K.13:0:45(पाण्यात विरघळणारे)

कृभको

 

युरिया

झिंक सल्फेट,

शिवालिक (Sea weed)

चंबळ

युरिया

N.P.K.20:20:0:13 (दाणेदार)

इफको

युरिया

N.P.K.10:26:26 नॅनो युरिया

Spic

युरिया

N.P.K.20:20:0:13 (दाणेदार)

झुआरी

युरिया

N.P.K.20:20:0:13 (दाणेदार)

 

खत विक्रेत्यांचे काय आहे म्हणणे

मोठमोठ्या कंपन्या आमच्यावर लिंकींगची सक्ती करत असतात. त्यामुळे आम्हाला तो माल इच्छा नसताना शेतकऱ्यांना विकावा लागतो. बरेचदा शिल्लक स्टॉक खपविण्यासाठी कंपन्या विक्रेत्यांवर दबाव आणून लिंकींगची सक्ती करतात, अशी अनेक खतविक्रेत्यांनी ‘लोकमत ॲग्रो’ कडे दिली. एका बाजूला कंपनीचा दबाव, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा दबाव आणि त्यात कृषी विभागाच्या कारवाईसाठी सोपे टागेर्ट अशी गावोगावच्या खत विक्रेत्यांची गत झाली असल्याच्या प्रतिक्रिया खत विक्रेत्यांच्या आहेत.

(हे ही वाचा युरिया वापरताय जरा जपूनच अवाजवी वापर ठरू शकतो घातक)

लिंकींग म्हणजे काय?‘’

खरिप किंवा रबी हंगामात शेतकऱ्यांना युरिया, डीएपी अशा खतांची आवश्यकता असते. मात्र खत विक्रेत्यांकडून त्यांना संबंधित कंपन्यांच्या इतरही उत्पादने मागणी नसताना व आवश्यकता नसताना गळ्यात मारल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यावर गरज नसताना आर्थिक बोजा पडतो. पूर्वीच्या काळी रेशनवरच्या रॉकेल किंवा केरोसीनसाठी ग्राहकांवर दुकानातील इतर वस्तू घेण्याची सक्ती संबंधित दुकानदार करत असे. तसाच हा प्रकार आहे.

आमची फार्मर प्रोड्युसर कंपनी असून कंपनीच्या मालकीचे खत-बियाणे यांचे दुकान आहे. कंपन्यांकडून लिंकींगची सक्ती करण्यात आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही खतांची विक्रीच बंद केली, त्यामुळे आता पॉस यंत्र परत द्यावे लागते की काय अशी भीतीही आहे.

-शैलेश दिलीप माळगे, संचालक, गुंजोटी फार्मर प्रोड्युसर कंपनी, उमरगा, जि. धाराशिव

अवकाळी पावसामुळे अलीकडच्या काही वर्षात शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे पूर्वीसारखी खतांची खरेदी शेतकरी करत नसल्याने राहिलेला स्टॉक खपविण्यासाठी कंपन्या लिंकींग करत असतात. पण शेतकऱ्याची परिस्थिती फारच बिकट आहे. लहरी हवामान व नापिकीमुळष नाशिक जिल्ह्यातील ५५ हजार शेतकऱ्यांवर कर्ज थकल्याची नामुष्की आली असून जिल्हा बँक या सर्वांच्या मालमत्ता जप्त करण्याच्या तयारीत आहेत. लिंकीग असो किंवा जप्ती शेतकऱ्यांना आता आंदोलनाशिवाय गत्यंतर नाही.

भगवान बोराडे, राज्य समन्वयक, शेतकरी संघटना, नाशिक

टॅग्स :खतेखरीपपेरणीशेतकरीशेती