पुणे जिल्ह्यातील तब्बल सव्वादोन लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला असून त्यामुळे १ लाख २६ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. गेल्यावर्षी पुणे जिल्ह्यात ही संख्या केवळ ९ हजारांच्या घरात होती. मात्र, या योजनेत बीड जिल्ह्यात बनावट विमा भरल्याचे प्रकरण समोर आल्याने सर्व जिल्ह्यांत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यात एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनीनेही अशा स्वरूपाच्या प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे.
जिल्ह्यात सव्वादोन लाख शेतकऱ्यांनी काढला विमा
जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख २६ हजार २४० शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. त्यात सर्वाधिक शेतकरी शिरूर तालुक्यातील आहेत. येथील सुमारे ३९ हजार ९७६ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. तर सर्वात कमी ३ हजार १६७ शेतकरी हवेली तालुक्यातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील १ लाख २६ हजार ३८० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे.
बनावट विमा काढणाऱ्यांवर होणार कारवाई
बीड जिल्ह्यातील अशा बनावट पीकविमा काढणाऱ्या प्रकरणांची राज्य स्तरावर गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार अशा बनावट विमा काढणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत कृषी विभागाने दिले आहेत. त्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईत एक तातडीची बैठकही घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.
चौकशीचे आदेश
पीकविमा भरल्यानंतर विमा कंपन्यांचे प्रतिनिधी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत विमाधारक शेतकऱ्यांची पडताळणी करतात. हे प्रकरण उघड झाल्यानंतर याबाबत कृषी विभागाने संबंधित विमा कंपन्यांना याची तातडीने चौकशी करावी, असे आदेश सर्वच जिल्ह्यांना दिले आहेत.
कोणत्या तालुक्यात किती शेतकऱ्यांनी काढला विमा?
तालुका विमा काढलेले शेतकरी
हवेली ३१६७
मुळशी ५४२५
भोर ८१७९
मावळ १५६२७
वेल्हा ६८०४
जुन्नर ३२००६
खेड २३२३९
आंबेगाव १९७५२
शिरूर ३९९७६
बारामती ३०४६३
इंदापूर १३७८३
दौंड ५०९१
पुरंदर २२७२८
एकूण २२६२४०
पुणे जिल्ह्यात विम्याच्या पडताळणीसाठी एचडीएफसी जनरल इन्शुरन्स विमा कंपनीला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. - संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे