रवी दामोदर
राज्यात २०१७ च्या खरीप हंगामातील शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भावाचा अनुभव लक्षात घेऊन त्यानंतर कृषी विभागाकडून राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणात आढळून आला. यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी क्षेत्रीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
त्यासाठी १६ मे २०२४ पासून कापूस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. त्यापूर्वी बियाण्याची विक्री केल्यास संबंधित कंपनी, किरकोळ विक्रेत्यावर कारवाई होणार आहे. यासंदर्भात कृषी विभागाने विभागीय कृषी सहसंचालक यांना आदेशित केले आहे.
कापूस शास्त्रज्ञांच्या मतानुसार शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित न झाल्याने प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. हंगाम पूर्व कापूस लागवड झाल्यास शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रमास पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेत यंदा शेंदरी बॉड अळीच्या प्रादुर्भावास आळा घालण्याकरिता हंगाम पूर्व कापसाची लागवड होणार नाही.
लागवड १ जून नंतरच
• १६ मेपासून कापूस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून प्रत्यक्ष लावगड ही १ जून २०२४ नंतरच होणार आहे. कटाक्षाने पालन केल्यास शेंदरी (गुलाबी) बोंड अळीचा प्रादुर्भाव प्रभावीपणे नियंत्रित करणे शक्य होणार आहे.
• याकरिता क्षेत्रीय स्तरावर कटाक्षाने पालन करणे बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी काटेकोर नियोजन करून अंमलबजावणी करावी व विभागीय कृषी सहसंचालक यांनी त्यावर सनियंत्रण ठेवावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
कापूस बियाणे पुरवठा करण्या बाबत निर्देशित दिनांक पुढीलप्रमाणे
उत्पादक कंपनी ते वितरक - ०१ ते १० मे २०२४
वितरक ते किरकोळ विक्रेता - १० मे २०२४ नंतर
किरकोळ विक्रेता ते शेतकरी - १५ मे २०२४ नंतर
शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लागवड - १ जूननंतर
कापूस बियाण्याची विक्री दुकानदार यांनी शेतकऱ्यांना १५ मे नंतर करता येईल, परंतु शेतकरी बांधवांनी सेंद्रिय बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता १ जून नंतरच बियाण्याची लागवड करावी. - शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला
हेही वाचा - एकरात लाखोंची कमाई देणारी तूर भारी; ऊस, कपाशीला आता नको म्हणतोय शेतकरी