Join us

अकोला येथे नव्याने सुरु झालेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरु; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 11:12 IST

Akola Veterinary College महाराष्ट्रात अकोला येथे नव्याने पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाली असून, त्यामुळे राज्यातील एकूण जागा आता ४६४ इतक्या झाल्या आहेत.

महाराष्ट्रात अकोला येथे नव्याने पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाली असून, त्यामुळे राज्यातील एकूण जागा आता ४६४ इतक्या झाल्या आहेत.

पशुवैद्यकीय अभ्यासक्रम करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता, राज्यातील महाविद्यालयांची संख्या अत्यंत अपुरी आहे. ती दूर करण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे. पशुवैद्यकीयसाठी २०२५ साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नवे महाविद्यालय नागपूर विभागांतर्गत येत असून, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के जागा राखीव आहेत तर राज्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के जागा उपलब्ध आहेत.

‘नीट २०२४’ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २१ मार्चपर्यंत अर्ज करता येतील. ३१ मार्च रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी घोषित होईल आणि ४ एप्रिल रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.

विभागीय कोट्याची पहिल्या फेरीची निवड यादी ८ एप्रिल रोजी घोषित होईल तर राज्य कोट्याची पहिली यादी ९ एप्रिल रोजी घोषित होईल.

या नवीन महाविद्यालयामुळे राज्यात सरकारी पशुवैद्यकीय महाविद्यालयांची संख्या सहा इतकी झाली आहे. राज्यात अद्याप एकही खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय नाही.

२०२४ ची प्रवेश प्रक्रिया इतक्या उशिरा सुरू करण्यात आल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टरांची संख्या फक्त ११ हजार इतकीच आहे तर पशुवैद्यकीय महाविद्यालयांची संख्या फक्त पाच आहे.

अधिक माहितीसाठी विद्यापीठाचे संकेतस्थळ www.mafsu.ac.in ला भेट द्यावी. दि. २५/०६/२०२४ च्या विद्यापीठ अधिसुचनेनुसार (पशुवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या) प्रवेशाकरीता यापुर्वी केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

सदर प्रवेश प्रक्रिया केवळ पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, अकोला करीता राबविण्यात येणार असल्यामुळे जुने अर्ज विचारात घेण्यात येणार नाहीत, त्यामुळे उमेदवारांनी प्रवेशाकरीता नविन अर्ज भरणे आवश्यक राहील, याची नोंद घेण्यात यावी.

पशुवैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढविण्याची मागणी वारंवार होत आहे. त्या अनुषंगाने हे नवीन महाविद्यालय सुरू झाल्यामुळे राज्यातील उपलब्ध जागांची संख्या ४६४ इतकी झाली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची आवश्यकता असून, जळगाव येथेही पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. २०२५ मध्ये हे महाविद्यालय देखील सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली

टॅग्स :दुग्धव्यवसायअकोलामहाविद्यालयविद्यार्थीमहाराष्ट्रनागपूरविद्यापीठ