भा.कृ.अनु.प. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर, भा.कृ.अनु.प.अटारी, पुणे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या संयुक्त विद्यमाने शेकटा, ता.पैठण येथे विशेष कापूस प्रकल्पांतर्गत नुकताच शेतकरी मेळावा कार्यक्रम घेण्यात आला.
या किसान मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. इन्द्र मणि, कुलगुरू वनामकृवी परभणी होते. डॉ. इंद्र मणि यांनी सांगितले की, शेतकरी बांधवांनी वाढीव उत्पादन घेत असताना रासायनिक घटकांचा वापर कमीतकमी करून उत्पादन खर्च कमी करणे आवश्यक आहे.
तसेच एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब करावा. कारण खाद्य सुरक्षा ही राष्ट्र सुरक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे. तसेच पीक पद्धती मध्ये देखील बदल करण्याची गरज आहे.
परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या तुरीच्या बिडीएन ७११ आणि गोदावरी या वाणांचा शेतकरी बांधवाना खूप मोठ्या प्रमाणावर अवलंब करून उत्पादनात वाढ करत आहे. तसेच प्रगतशील शेतकऱ्यांनी अवलंब केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रसार इतर शेतकरी बांधवा मध्ये करण्यास कार्य करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे मा.कुलगुरू डॉ.इन्द्र मणि यांनी केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. गिरीधारी वाघमारे, संचालक, विस्तार शिक्षण वनामकृवि, परभणी, डॉ. एस. बी. पवार, सहयोगी संचालक संशोधन, एनएआरपी, छत्रपती संभाजीनगर, डॉ. ए. एस. तायडे, मुख्य शास्त्रज्ञ, डॉ.व्ही.एस. नगरारे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, डॉ.सुनील महाजन, वरिष्ठ शास्त्रज्ञ केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर, शेकटा गावचे सरपंच विष्णू पाटील भवर यांची उपस्थिती होती.
तसेच डॉ. दिप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१, प्रगतीशील शेतकरी रवींद्र भवर, आबासाहेब भवर, विषय विशेषज्ञ डॉ.अनिता जिंतूरकर, डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भवर, अशोक निर्वळ, सतीश कदम, जयदेव सिंगल, जयदीप बनसोडे, शिवा काजळे व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. वाघमारे यांनी सांगितले की, तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी विद्यापीठ कटीबद्ध आहे. वातावरण बदलामुळे शेतीमध्ये विविध आव्हाने येत असून शेतकऱ्यांनी अभ्यासुपणाने शेती करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध संसाधनाचा वापर करुन अधिक उत्पादन घेण्यावर भर द्यावा. यासाठी विशेष कापूस प्रकल्पा सारख्या प्रकल्पांचा लाभ घेऊन सुधारीत लागवड पद्धतीचा अवलंब करावा.
डॉ. नगरारे यांनी सांगितले की, विशेष कापूस प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांचे महाराष्ट्रात उत्पादन वाढत आहे, असे सांगितले. तसेच कापूस पिकामध्ये दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान, सघन लागवड व अतिघन लावगड याबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
छत्रपती संभाजीनगर जिल्हातील या प्रकल्पांतर्गत कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी करत आहे. तसेच येत्या काळात कापूस पिकाचे उत्पादन कसे वाढविता येईल. याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे.
डॉ.तायडे आणि डॉ. दिप्ती पाटगावकर यांनी सांगितले की, कापूस पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी उत्पादन खर्च देखील कमी करण्याची गरज आहे. आणि यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य, कीड रोग आणि लागवड पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. कापूस पिकामध्ये फवारणी व खतांवर अमाप खर्च करत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्याची गरज आहे आणि यासाठी एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा, असे त्यांनी सांगितले.
डॉ. दिप्ती पाटगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी प्रगतशील शेतकरी रवींद्र भवर, आबासाहेब भवर, यज्ञेश कातबने यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या शेतकऱ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. पिसुरे यांनी केले तर आभार डॉ. अनिता जिंतूरकर यांनी मानले.