अरुण बारसकर
सोलापूर : यंदा पाऊस पुरेसा पडल्याने राज्यभरात ऊस लागवडीची लगबग सुरू झाली आहे. जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्रावर आडसाली ऊस लागवड झाल्याची नोंद कृषी खात्याकडे झाली आहे.
कोकण, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा अपवाद सोडला तर राज्यातील सर्वच जिल्ह्यात ऊस उत्पादन घेतले जाते. मागील काही वर्षांत विदर्भातही ऊस उत्पादन वाढत आहे. यंदा जून महिन्यापासून राज्यभरात विशेषतः ऊस लागवड होणाऱ्या पट्टयात चांगला पाऊस पडला आहे.
त्यामुळे दोन लाख हेक्टर आडसाली ऊस लागवड झाली आहे. मागील वर्षी पीक जोपासण्याइतकाही पाऊस पडला नाही. त्यामुळे इतर पिके तर गेलीच होती, शिवाय उसालाही फटका बसला होता.
तो ऊस पुरेसे पाणी न मिळाल्याने जमविणे कठीण असताना नवीन ऊस लागवडीचे धाडस मागील वर्षी शेतकऱ्यांनी केले नव्हते. यावर्षी जून महिन्यापासून पाऊस पुरेसा पडत आहे.
त्यामुळे जून महिन्याच्या शेवटी-शेवटी ऊस लागवडीला सुरुवात झाली. त्यानंतरही पाऊस पडत राहिल्याने ऊस लागवडही सुरू आहे. त्यामुळेच ऊस लागवडीचे क्षेत्र वाढत आहे.
राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ६४ हजार हेक्टर, साताऱ्यात ३१ हजार हेक्टर, सोलापूर व सांगली जिल्ह्यात प्रत्येकी २३ हजार हेक्टर, अहमदनगर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर, तर कोल्हापूर जिल्ह्यात ११ हजार हेक्टरवर आडसाली ऊस लागवड झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यात ८ हजार हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यात ७ हजार हेक्टर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६ हजार, हिंगोलीत ३,३०६ हेक्टर, धुळे व परभणीत प्रत्येकी बाराशे हेक्टर, नंदुरबार सत्तावीससे हेक्टर, नाशिक जिल्ह्यात बावीससे हेक्टर, तर १० जिल्ह्यात अत्यल्प ऊस लागवडीची नोंद कृषी खात्याकडे झाली आहे.
शेतकऱ्यांनी नवीन व सुधारित जातीचा ऊस लावावा, एकरात ऊस मोजण्यापेक्षा एकरात अधिक वजन (अधिक टनेज) निघण्यावर लक्ष द्यावे. कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेऊन उर्वरित शेतात इतर पिके घेता येतात. अगोदरच भाव हिस्सेदार वाढत असल्याने प्रत्येकाच्या वाट्याला जमीन कमी येत आहे. आमच्याकडे एकरी १४० टन उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. - डॉ. अंकुश चोरमुले, ऊस अभ्यासक, सांगली