बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा अग्रिम मिळण्यास सुरुवात झाली आहे; परंतु काही शेतकऱ्यांनी पीकविमा भरताना भाडेपत्र किंवा करारपत्र दिले नाही त्यांचे अर्ज पुन्हा पाठविले आहेत. संबंधित शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सूचित केले आहे. परिणामी, कागदपत्रे अपूर्ण असणाऱ्या शेतकऱ्यांना अग्रिमसाठी वाट पाहावी लागणार आहे.
खरीप हंगामामध्ये पीक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी, यासाठी राज्य शासनाने पीकविमा योजना सुरू केली होती. यंदा खरीप हंगामात केवळ एक रुपया भरून शेतकऱ्यांनी आपला पीकविमा भरला होता, शेतकऱ्यांचा प्रीमियम राज्य व केंद्र शासनाने पीकविमा कंपनीला नुकताच दिला आहे. त्यामुळे पीकविमा कंपनीकडून शुक्रवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिमची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने वेळेवर अग्रिम रक्कम देण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी भरपूर प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले. आता अग्रिम वाटप सुरू झाले आहे.
परंतु, ज्या शेतकऱ्यांनी भाडेपत्र किंवा करारपत्र दिले नाही, त्यांचे अर्ज पुन्हा पाठविले आहेत. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांना आठ दिवसांचा कालावधी दिला आहे. त्या संबंधीचे मेसेज ही त्यांना विमा कंपनीकडून देण्यात आले आहेत. कागदपत्रे दिल्यानंतर त्याची पडताळणी करून अग्रिमबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. किती शेतकऱ्यांचे अर्ज पुन्हा पाठविण्यात आले आहेत, याची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही.