अफलाटॉक्सिन(Aflatoxin) हे अस्पर्जीलास फ्लेवस, अस्पर्जिलास प्यारा सिटी कस आणि अस्परजीलास नॉमनीस सारख्या बुरशीद्वारे उत्पादित अत्यंत विषारी दुय्यम चया पचायांपैकी एक आहे. अफला टॉक्सिनचे चार मुख्य प्रकार आहेत जसे की आफलाटॉक्सिन बी 1, बी 2, जी 1, जी 2. यापैकी बी 1 हे अत्यंत विषारी आहे.
अफलाटॉक्सिनची ऐतिहासिक पार्श्वभूमी
सन 1960 साली इंग्लंडमध्ये टर्की पक्षाचा एक नवीन रोग आढळून आला. ज्यामुळे दहा लाखापेक्षा जास्त टर्की पक्षी मरण पावले आणि या आजारास 'टर्की एक्स रोग' असे नाव देण्यात आले. या मागचे कारण शोधताना संशोधकांना असे आढळले की, पशुखाद्य म्हणून ब्राझील मधून आयात करण्यात आलेल्या भुईमुगाच्या पेंडीमध्ये अफलाटॉक्सिन नावाचा विषारी घटकांनी अत्यंत दूषित होती.
मानवी आरोग्यावर अफलाटॉक्सिनचा प्रभाव
इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च अँड कॅन्सर नुसार अफलाटॉक्सिन ग्रुप 1 कार्सिनोजेन मानले जाते अनेक देशांमध्ये यकृताचा कर्करोग अफलाटॉक्सिनच्या विषबाधा संबंधित आहे. याव्यतिरिक्त अफलाटॉक्सिन रोगप्रतिकारक क्षमता कमी करते. सन १९७४ मध्ये अफलाटॉक्सीनमुळे कावीळ या आजाराचा मोठा उद्रेक भारतात विशेषतः गुजरात आणि राजस्थान राज्यांमध्ये नोंदवला गेला. परिणामी अंदाजे 106 मृत्यू नोंदवण्यात आले.
'अफलाटॉक्सिन'ची किमान स्वीकार्य मर्यादा
वेगवेगळ्या देशांनी अन्न आणि खाद्य उत्पादनामध्ये अफलाटॉक्सिनची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने दुग्धजन्य पदार्थांसाठी किमान अफलाटॉक्सिन एकाग्रतेची पातळी 0.5 मायक्रोग्राम/ किलो निश्चित केली आहे. म्हणून काढणीपश्चात, आपल्या उत्पादनामध्ये प्रादुर्भाव आढळून आल्यास मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून चाचणी करून घ्यावी. जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही.
अफलाटॉक्सिन चा प्रादुर्भाव कोणत्या पिकांवर होतो?
अस्पर्जीलसचा प्रादुर्भाव प्रामुख्याने भुईमूग, गहू, मका, काजू आणि कापूस या पिकांवर होतो. तसेच काही वेळा पनीर मध्ये देखील याचा प्रादुर्भाव दिसून येतो
अफलाटॉक्सिनशी संबंधित सुरक्षा उपाय
1. अफलाटॉक्सिन प्रभावित अन्नपदार्थ खाऊ नयेत.
2. योग्य आद्रतेवर उत्पादनाची कापणी करावी आणि इष्टतम ओलाव्यापर्यंत वाळवणी करावी. कापणी केलेले धान्य स्वच्छ आणि कोरड्या जागी ठेवावे.
3. शेतमालाच्या साठवणुकीसाठी सुधारित पिक स्टोरेज पिशव्यांचा वापर करावा.
4. शेतात जैविक नियंत्रण उपायांचा वापर करावा जसे की अपर्जीलास फ्लेवस आणि अस्फरजीलास पॅरासिटीच्या विषारी नसलेल्या प्रजातींसह बीजप्रक्रिया करावी.
5. अफलाटॉक्सिन प्रभावित उत्पादन हाताळताना मास्कचा वापर करावा.
6. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतात योग्य प्रमाणात ओलावा ठेवावा.7. खराब झालेले बिया किंवा काजू उत्पादनातून काढून टाकावे.
8. अफलाटॉक्सिनच्या नियंत्रण आणि व्यवस्थापन याकरता बॅसिलस सबटीलास, लॅक्टोबॅसिलस आणि सुडोमोनास या जैविक रोग नियंत्रकांचा बीजप्रक्रियेसाठी वापर करावा.
9. चांगल्या कृषी पद्धती विषारी द्रव्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवण्यास मदत करतात म्हणून पिकांची वेळेत लागवड करावी रोपांना पुरेशी पोषण द्यावे तणांचे नियंत्रण करावे.
1.प्रविण सरवळे (आचार्य पदवी विद्यार्थी)
2. डॉ. व्ही. ए. राजेमहाडिक (सहाय्यक प्राध्यापक)
3. डॉ. व्ही. जी. मोरे (सहयोगी प्राध्यापक) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.