Join us

तीस वर्षानंतर यंदा खरिपात या जिल्ह्यात कांद्याची २७ हजार हेक्टरवर पेरणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 10:19 AM

तब्बल तीस वर्षानंतर यंदा सोलापूर जिल्ह्यात खरिपात कांद्याची बक्कळ पेरणी झाली आहे. मागील वर्षी जून महिन्यात पाऊस बेताचा पडला होता. त्यामुळे खरीप पेरणी तसेच कांदा व टोमॅटो लागवड बेतातच होती.

अरुण बारसकरसोलापूर : जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्याने यंदा जून व जुलै महिन्यातच खरीप पेरणी पावणेदोनशे टक्क्यांपर्यंत गेली असताना कांदाटोमॅटो लागवडीचेही असेच झाले आहे. मागील वर्षांच्या तुलनेत टोमॅटोची दुप्पट लागण झाली तर कांद्याची २० हजार हेक्टर अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

तब्बल तीस वर्षानंतर यंदा जिल्ह्यात खरिपात कांद्याची बक्कळ पेरणी झाली आहे. मागील वर्षी जून महिन्यात पाऊस बेताचा पडला होता. त्यामुळे खरीप पेरणी तसेच कांदा व टोमॅटो लागवड बेतातच होती.

अगदी चार महिन्यांच्या कडक उन्हाळ्यात तळाशी पाणी गेल्यानंतर जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने कांदा व टोमॅटो लागवडीवर मागील वर्षी परिणाम झालेला दिसला. जुलै महिन्यात सरासरी इतका पाऊस पडला.

मात्र जून व ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी पडल्याने इतर सर्व पिके टाळून कांदा लागवड केली होती. यंदा मागील वर्षीच्या उलट परिस्थिती आहे. जून व जुलै या दोन्ही महिन्यात चांगला पाऊस पडला आहे.

त्यातच पेरणीसाठी पोषक वातावरण असल्याने यंदा कांद्याची लागवडी ऐवजी पेरणीवर भर दिला आहे. मागील वर्षी जून व जुलै महिन्यात टोमॅटो ११४० हेक्टर तर कांदा ६ हजार ६३४ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली होती.

यंदा २४ जुलैपर्यंत टोमॅटोची लागवड २२०१ हेक्टर तर कांद्याची पेरणी २७ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. यातील काही क्षेत्रांवर कांदा लागवड झाली तर बहुतेक क्षेत्रावर पेरणी झाली असल्याचे सांगण्यात आले.

पीकसरासरी क्षेत्रमागील लागवडयंदाची लागवड
टोमॅटो२१५०११४०२१००
कांदा११५१०६६३५२७०००

सर्व आकडे हे हेक्टरमध्ये आहेत.

मागील वर्षी पाऊस कमी पडल्याचा परिणाम कांदा, टोमॅटो व इतर फळभाज्या व पालेभाज्या लागवडीवर झाला होता. यंदा जून महिन्यात चांगला पाऊस पडत राहिल्याने शेतकऱ्यांनी कांद्याची सर्रास पेरणी केली. लागवडीवर होणारा खर्च कांदा पेरणीमुळे कमी झाला. हवामान चांगले राहिले तर कांद्याचे उत्पादनही वाढेल. - दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

चार एकर कांदा पेरलाय यंदा चांगला पाऊस झाल्याने पेरलेला कांदा चांगला आला आहे. तणनाशक फवारल्याने खुरपणीचे पैसे वाचतील. रोपही लागवडीला आले आहे त्यातून कांदा लागवड करणार आहे. - अमोल साठे, कांदा उत्पादक शेतकरी

टॅग्स :कांदासोलापूरशेतकरीशेतीपीकटोमॅटोपेरणीपाऊसखरीप