Join us

राज्यात ७७% पावसानंतर खरिपाच्या किती पेरण्या झाल्या ? माहितीसाठी क्लिक करा

By नितीन चौधरी | Published: July 22, 2023 11:13 AM

यंदा मृगाचं नक्षत्राला पावसानं ओढ दिली, त्यामुळे पेरण्यांबद्दल शेतकऱ्यांसह सर्वांनाच काळजी होती. १५ जुलैपर्यंत कापसाची पेरणी करता येते. त्यामुळे कपाशीच्या शेतकऱ्यांनाही काळजी होती.

गेल्या चार दिवसांपासून राज्यात सर्वत्र होत असलेल्या पावसाने खरिपाच्या पेरण्या मार्गी लागल्या असून आतापर्यंत सुमारे १ कोटी ११ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ७८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

सोयाबीन पिकाची गेल्या वर्षाच्या तुलनेत १०४ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. कापूस पिकाचीही लागवड ३९ लाख ५९ हजार हेक्टरवर अर्थात १०० टक्के झाली आहे. राज्यात आतापर्यंत ७७ टक्केच पाऊस झाला असून सर्वात कमी पाऊस पुणे विभागात केवळ ४३.३ टक्के झाला आहे. सर्वाधिक पाऊस कोकण विभागात ९०.६ टक्के झाला आहे.

राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ७७ टक्के पाउस झाला असून ७८.५० टक्के पेरण्या झाल्या आहेत. राज्यात खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र १४२.०२ लाख हेक्टर असून १ कोटी ११ लाख ४८ हजार ४५६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यात मुगाची केवळ १ लाख ३८ हजार ४९९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या ही पेरणी ३५ टक्केच असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याची टक्केवारी ५६ इतकी आहे. तर उडीद पिकाची आतापर्यंत केवळ १ लाख ६० हजार ४३८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या ही पेरणी ४३ टक्केच असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याची टक्केवारी ५५ इतकी आहे.

सोयाबीन , कापूस १०० टक्के पेरणी

राज्यात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनखाली असून सरासरी ४१ लाख ४९ हजार ९१२ हेक्टरवर पेरणी केली जाते. तर गेल्या वर्षी ४३ लाख २० हजार २७७ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत १०० टक्के अर्थात ४३ लाख ४ हजार १७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर सरासरीच्या तुलनेत ही पेरणी १०४ टक्के आहे. यंदा कृषी विभागाने सोयाबीनची पेरणी ५० लाख हेक्टरवर जाईल अशी अपेक्षा ठेवली होती. मात्र, पाऊस उशिरा आल्याने यात कमी वाढ होईल असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. कापूस पिकाखालीही राज्यात आतापर्यंत ३९ लाख ५९ हजार १६१ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हेच क्षेत्र ३९ लाख ७८ हजार ५६६ हेक्टर इतके होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत १०० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

भात लागवड गेल्या वर्षाच्या तुलनेत ८३ टक्के

राज्यात कोकण तसेच घाट परिसरातील पुणे, नाशिक, कोल्हापूर व पूर्व विदर्भात चागंला पाऊस झाल्याने भाताच्या पुनर्लागवडीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. राज्यात भाताचे सरासरी पेरणी क्षेत्र १५ लाख ८ हजार ३७४ हेक्टर असून गेल्या वर्षी ६ लाख २२ हजार १३१ हेक्टरवर पेरणी झाली होती. तर यंदा आतापर्यंत ५ लाख १७ हजार ४१ हेक्टरवर लागवड झाली आहे. सरासरीच्या ही लागवड ३४ टक्के तर गेल्या वर्षाच्या तुलनेत लागवड ८३ टक्के झाली आहे.

सांगली कोल्हापुरात सर्वात कमी पाऊसराज्यात कोकण विभागात आतापर्यंत सरासरीच्या ९०.६ टक्के पाऊस झाला आहे. त्या खालोखाल नागपूर विभागात ८८.५ टक्के पाऊस झाला आहे. सर्वात कमी पाऊस पुणे विभागात ४३.३ टक्केच झाला आहे. त्यानंतर नाशिक विभागात ६७.६ टक्के पाऊस झाला आहे. अमरावती विभागात ७४.५ तर संभाजीनगर विभागात ७१.२ टक्के पाऊस झाला आहे. सर्वात कमी पाऊस सांगली जिल्ह्यात ३७.४ टक्के व कोल्हापूर जिल्ह्यात ३८.५ पाऊस झाला आहे. राज्यात सर्वाधिक पाऊस पालघरमध्ये सरासरीच्या १२६ टक्के झाला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार २४ जुलैपर्यंत राज्यात बहुतेक ठिकाणी पाऊस राहील. त्यानंतर उर्वरित पेरण्या पूर्ण होतील अशी आशा आहे.- सुनील चव्हाण, आयुक्त, कृषी

टॅग्स :खरीपमोसमी पाऊसपेरणीशेती