Join us

कांदा, सोयाबीन, हरभऱ्यानंतर आता दार्जिलिंगचे चहा उत्पादकही अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 4:12 PM

कांदा, सोयाबीन, ऊसानंतर आता चहा उत्पादकही अडचणीत सापडले आहे.

केंद्र सरकारची निर्यातविषयक असलेली धरसोडीची धोरणे आणि त्यात हवामान बदलाचा फटका यामुळे कांदा, सोयाबीन, ऊस, तूर, हरभरा, भात यांसह बहुतेक शेतमाल पिकवणारे शेतकरी देशात अडचणीत आले आहेत. त्यात आता चहाच्या मळ्यांचीही भर पडली आहे. दार्जिलिंग येथील चहा उद्योग अडचणीत सापडला आहे. 

इंडियन टी असोसिएशन (ITA) ने अडचणीत सापडलेल्या दार्जिलिंग चहा उद्योगाला पाठिंबा द्यावा यासाठी केंद्र सरकारला मदतीचे आवाहन केले आहे. 

उत्पादनात घट आणि घसरलेल्या किमती यामुळे दार्जिलिंगमधील परिस्थिती गंभीर असल्याचे आयटीएने म्हटले आहे. अशा परिस्थितीत आर्थिक मदत पॅकेजशिवाय दार्जिलिंग चहा उद्योगाचे अस्तित्व धोक्यात येईल असे चहा उत्पादकांचे म्हणणे आहे. एका संकेतस्थळाने हे वृत्त दिले आहे.

मार्च 2022 मध्ये वाणिज्य विषयक संसदीय स्थायी समितीने मंजूर केलेल्या आर्थिक पुनरुज्जीवन पॅकेजवर विचार करावा आणि त्यावर कार्यवाही करावी असे आवाहन आयटीएने केले आहे.

आयटीएने सांगितले की भारतातून चहाची निर्यात जानेवारी-डिसेंबर 2023 मध्ये 22.79 कोटी किलोग्रॅमवर ​​घसरली, तर 2022 मध्ये 23.10 कोटी किलोग्रॅमची निर्यात झाली. 

प्रतिकूल हवामानामुळे आसाम आणि पश्चिम बंगालमधील चहाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे, ज्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट झाली असल्याचे आयटीएने म्हटले आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती