राज्यात खरीप हंगामात नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ई- पीक अॅपवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस या पिकांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.
भात हे रायगड जिल्ह्याचे मुख्य पीक आहे. जिल्ह्यातील लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी ७० टक्के भाताचे पीक घेतले जाते. भात उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो.
मानगाव, अलिबाग, पेण आणि पनवेल या तालुक्यात भात पीक मोठ्या प्रमाणात घेतात. राज्यात कापूस आणि सोयाबीन हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याप्रमाणे तालुक्यात भात पीक घेतले जाते.
यंदा राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याकरिता शासनाकडून सोयाबीन आणि कापूस यास हेक्टरी ५ हजारांचे अनुदान देण्यात येत आहे.
त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यासह तालुक्यात भात शेतीचे नुकसान झाल्यास शासनाकडून भरपाई दिली जाते; मात्र सद्यःस्थितीत तालुक्यात नुकसान झाले नसल्याचे चित्र आहे.
नुकसान किती?
अतिवृष्टीने ३३ टक्के पेक्षा जास्त भात क्षेत्राचे नुकसान झाल्यास शासनाकडून भरपाई मिळते. यासाठी कृषी विभाग, तलाठी, ग्रामसेवक यांची ग्रामपातळीवर समिती असते. पंचनामा करून भरपाई देण्याची तरतूद आहे. गतवर्षी हेक्टरी ६ हजार ८०० रुपये देण्यात आले होते.
पावसाची उसंत
काही दिवसात भात काढणीला सुरुवात होणार आहे. या दरम्यान पावसाचा जोर वाढल्यास भात पिकाचे नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. गत आठवड्यात पावसाचा जोर वाढला होता. त्यात अनेक भात पिकाचे लोळवण झाले होते. त्यानंतर उघडीप दिल्याने पिके सावरली आहेत. काढणीच्यावेळी पावसाने गडबड करू नये अशी चिंता आता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.