Join us

अवकाळीच्या तडाख्यानंतर महसूल व कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 5:32 PM

लवकरात लवकर नुकसानीची तक्रार विमा कंपनीकडे दाखल करावी

धाराशीव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात शनिवारी (दि. २०) दुपारी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने झोडपल्यानंतर महसूल व कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू करण्यात आले.

शनिवारी पडलेल्या या अवकाळी पावसात ज्वारी, फळबागा विशेषतः आंबा, पपई, केळी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. उभे पिक उद्धवस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. या पंचनाम्यानंतर शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना आर्थिक मदत मिळावी यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी बांधावर जाऊन पाहणी केली आहे.

गावोगावच्या सोशल मीडियावरही प्रशासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महसूल व कृषी खात्याकडून रविवारी उमरगा व  लोहारा तालुक्यात तातडीने पंचनामे सुरू करण्यात आले असून, या कार्यवाहीबद्दल शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

या वादळी अवकाळी पावसामध्ये विजा पडून काही जनावरे जागेवरच दगावली. त्याचेही पंचनामे करण्यात येत असल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगली; ग्रामीण डाक जीवन विमा योजना

कोणत्या मंडळात किती पाऊस..?

■ शनिवारी उमरगा तालुक्यात पडलेल्या पावसाची सरासरी १४.१ मिमी इतकी नोंदली गेली. यात उमरगा मंडळात २७.८ मिमी, डाळिंब १८ मिमी, नारंगवाडीत १३.३ मिमी, मुरूममध्ये १५.८ मिमी, लोहारा तालुक्यातील लोहारा मंडळात ४९ मिमी, माकणीमध्ये १७.३ आणि जेवळी मंडळात १८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाल्याचे उमरगा तालुका कृषी अधिकारी डी.बी. रितापुरे व लोहारा प्रभारी कृषी अधिकारी शिवाजी ताराळकर यांनी सांगितले.

त्वरित तक्रार दाखल करा

ज्या बागायतदार शेतकऱ्यांनी आंबा, केळी, पपई आदी फळपीक विमा भरला असेल त्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानीची तक्रार विमा कंपनीकडे दाखल करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी डी.बी. रितापुरे, मंडळ अधिकारी अभिजित पटवारी यांनी केले आहे.

टॅग्स :पाऊसशेतीशेतकरीपीक