Join us

गहू व ढग संशोधन केंद्रानंतर आता महाबळेश्वरच्या मातीत स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 11:04 AM

गहू व ढग संशोधन केंद्रानंतर आता महाबळेश्वरच्या मातीत स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र उभे राहत आहे. एकूण तीन एकर क्षेत्र या प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आले असून, इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे.

सचिन काकडेसातारा : गहू व ढग संशोधन केंद्रानंतर आता महाबळेश्वरच्या मातीत स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र उभे राहत आहे. एकूण तीन एकर क्षेत्र या प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आले असून, इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे.

मे अखेर हे काम पूर्णत्वास येणार असून, येथील शेतकऱ्यांना रोगप्रतिकारक्षम स्ट्रॉबेरीची लागवड करता येणार आहे. स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरचे मुख्य पीक असून, दरवर्षी सुमारे तीन हजार एकर क्षेत्रावर या पिकाची लागवड केली जाते.

अन्य पिकाप्रमाणे स्ट्रॉबेरीवर ग्रेमोल्ड, फुलकीडे, माइट, रेड स्टील, बोटरॅसिस, पावडर मेलेड्यू अशा प्रकारचे रोग येतात तर ॲन्थ्रक्नोज ही बुरशीदेखील पडते. याचा मोठा फटका स्ट्रॉबेरीला बसतो.

अशा रोगांपासून हे पीक वाचावे, शेतकऱ्यांना रोगप्रतिकारक्षम पिकांची लागवड करता यावी यासाठी महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू व्हावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. राहुरी कृषी विद्यापीठाने या संशोधन केंद्राला हिरवा कंदील दाखविल्याने संशोधन केंद्र उभारणीचा मार्ग मोकळा झाला.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि सुविधा• राष्ट्रीय कृषी प्रकल्प योजनेंतर्गत हा प्रकल्प साकारला जात आहे.• गहू गेरवा संशोधन केंद्राची नाकिंदा (ता. महाबळेश्वर) येथे २५ एकर जागेपैकी तीन एकर जागेवर हा प्रकल्प उभा राहत आहे.• सध्या येथे ग्लास हाऊस, दोन पॉली हाऊस, पॅकिंग व ग्रेडिंग हाऊस, प्रशिक्षण सभागृह, निवास व्यवस्था अशी कामे सुरू आहेत.• संशोधनाचे संपूर्ण कामकाज गहू गेरवा संशोधन केंद्रामार्फत चालविले जाणार आहे.

असे होणार संशोधन• महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला रोगराईचा फटका तर बसतोच शिवाय अवेळी पडणारा पाऊस, वातावरणातील बदलाचाही परिणाम होतो.• सर्व प्रकारचे रोग, माती, पाणी, खत आणि रोपांचे प्रयोगशाळेत संशोधन केले जाणार आहे.

दृष्टिक्षेपात प्रकल्प.. • प्रकल्पाची किंमत : ३.४३ कोटी• लागवड व संशोधन खर्च : ७१ लाख• बांधकाम खर्च : २.३१ कोटी• अवजारे, कृषी चिकित्सालय : ४० लाख• शासनाकडून निधी प्राप्त : ४० लाख• संशोधन केंद्रासाठी जागा : ३ एकर

संशोधन केंद्रामुळे स्ट्रॉबेरीवर पडणारा रोगांचा प्रादुर्भाव रोखता येईल. शेतकरी विनाकारण रोपांवर औषधांची फवारणी करतात, त्यावर आळा बसून, केमिकलमुक्त्त फळ उपलब्ध होईल. या केंद्रामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तरही उंचावेल. - किसनशेठ भिलारे, अध्यक्ष, फळे-फुले सहकारी संस्था, महाबळेश्वर

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे (राहुरी) कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील व संचालक संशोधक डॉ. डी. आर. गोरंटीवर यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्राचे काम सुरू आहे. या केंद्रात स्ट्रॉबेरी पिकावर पडणारे रोग, बुरशी, माती, पाणी, खत तसेच वातावरणातील घटकांचे सूक्ष्म परीक्षण केले जाणार आहे. - डॉ. दर्शन कदम, सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या

टॅग्स :शेतकरीफळेशेतीमहाबळेश्वर गिरीस्थानराज्य सरकारविद्यापीठकीड व रोग नियंत्रणगहू