नारायणगाव : ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) ग्लोबल कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. येणाऱ्या ९ जानेवारी ते १२ जानेवारी असे ४ दिवस हे कृषी प्रदर्शन असून यामध्ये विविध पिकांचे लाईव्ह डेमो दाखवण्यात येणार आहेत. त्याबरोबरच महिला स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि इतर खासगी कंपन्यांचे विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
दरम्यान, या कृषी महोत्सवाच्या तयारीसाठी प्रचाराचा आज (१ जानेवारी) शुभारंभ करण्यात आला आहे. कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी बळीराजाचा ग्रामोन्नती कृषी सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यसाठी, नवीन तंत्रज्ञान, तज्ञांचे मार्गदर्शन आणि शेतकऱ्याना, बचत गटाच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठे मिळवून देण्यसाठी या कृषी महोत्साचे आयोजन केले असल्याचे कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
यावेळी केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे आणि उद्यानविद्या विभाग प्रमुख श्री. भरत टेमकर यांच्या शुभहस्ते नारळ फोडून महोत्सवासाठीच्या प्रचार रथाचे उद्घाटन केले. यावेळी केंद्राचे शास्रज्ञ राहुल घाडगे, योगेश यादव, डॉ. दत्तात्रय गावडे, निवेदिता शेते, धनेश पडवळ, वैभव शिंदे, अभिजित केसकर, वसंत कोल्हे आदी उपस्थित होते.
आज शुभारंभ झालेला प्रचार रथ एक मोबाइल माहिती केंद्र म्हणून काम करेल. यात महोत्सवाचे वेळापत्रक, तज्ञांची चर्चासत्रे, प्रदर्शने आणि पिक प्रात्यक्षिके यांची माहिती प्रदर्शित केली जाईल. याशिवाय, माहिती पत्रके वितरीत केली जातील, स्थानिक शेतकर्यांशी संवाद साधेल आणि कृषी क्षेत्रातील प्रत्येक घटकाला सहभागासाठी प्रोत्साहित करेल. सदरील प्रचार रथ ग्रामीण भागातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार केला असून उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, तसेच अहिल्यानगर पारनेर, संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना या कृषी महोत्सवाच्या आयोजनाबद्दल माहिती मिळेल.
यावेळी बोलताना, डॉ. प्रशांत शेटे म्हणाले की "ग्लोबल कृषी महोत्सव हा शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात, करण्यासाठी आणि आधुनिक शेती पद्धती स्वीकारण्यासाठी एक व्यासपीठ आहे. या कृषी महोत्सवाचा प्रचार अभियान सुनिश्चित करते की, कोणताही शेतकरी या ग्लोबल कृषी महोत्सवाची माहिती मिळाली नाही म्हणून येऊ शकला नाही याची विशेष काळजी घेऊन सर्वदूर गावोगावी जाऊन महोत्सवाची माहिती पोहचविणार आहे."