ज्ञानार्जन करत असताना आलेले अनुभव व माहिती याचा सर्वसामान्य शेतकरी वर्गाला फायदा व्हावा व यातून शेतकरी बांधवांना आधुनिकतेच्या प्रवाहात आणण्यासाठी कृषी महाविद्यालयातर्फे गावागावांत कार्यक्रम आयोजित केला जातो.
याच अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित विविध विद्यालयात असे कार्यक्रम गेल्या आठवड्यात आयोजित करण्यात आल होते.
ज्यात एच. एच. श्री. श्री मुरलीधर स्वामीजी उद्यानविद्या महाविद्यालय मालेगाव यांच्यावतीने साठ दिवसांच्या कार्यक्रमाची सुरुवात (दि. १३) रोजी नाशिक जिल्ह्याच्या पिंगळवाडे (ता. बागलाण) येथे करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत कार्यालय पिंगळवाडे यांच्या आवारात झाले. याप्रसंगी सरपंच लताबाई भामरे, उपसरपंच रवींद्र शिंगरे तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व इतर कर्मचारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचा हेतू व फायदे संबंधित विद्यालयातील विद्यार्थी भूषण शिंदे, साई कांबळे, रोहित महाजन, रितेश गायकवाड, रोशन भामरे, यांनी संगितले. तसेच आपल्या मनोगतातून शैक्षणिक क्षेत्रात आलेले अनुभव हे ग्रामस्थांसमोर मांडले.
ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी सांगितले की आगामी काळात पिंगळवाडे परिसरातील शेतकरी वर्गाला विविध शेती संबंधित प्रात्यक्षिकपर मार्गदर्शन होणार आहे. यात माती, पाणी परीक्षण चे महत्व तसेच विविध प्रकारचे मशागतीचे प्रकार व नवनवीन रासायनिक खते औषधे याबाबत माहिती शेतकरी वर्गाला देणार आहेत. तसेच माध्यमिक शाळेचे विद्यार्थी यांना सुद्धा ते मार्गदर्शन करणार आहेत. हे सर्व कार्य करत असताना हे विद्यार्थी स्व:कर्तव्य करत पिंगळवाडे गावात तब्बल दोन महिने मुक्कामी असणार आहेत.
या कार्यक्रमाची संकल्पना उद्यानविद्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ व्ही. डी. पगार मॅडम यांची असून उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राध्यापक व्ही. डी. कापडणीस सर यावेळी प्रमुख म्हणून लाभले होते.
हेही वाचा - आता वाढेल एकरी पेरूचे उत्पन्न; यंदा अति सघन पद्धतीने अशी करा पेरूची लागवड