जयेश निरपळ
खरीप व रबी पेरणी सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर झाली. पाऊस चांगला पडला, पीक वाढीसाठी पोषक हवामान राहिले तर उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते, अशा वेळी बाजारात दर कोसळतात, यासाठी पणन महासंघाची माल तारण ठेवून कर्ज देण्याची योजना असली तरी मागील तीन वर्षांत अति व कमी पाऊस पडल्याने उत्पादनच फारसे हाती आले नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील गंगापूर आणि लासुर दोन्ही बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज शून्यावरच आहे.
शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन काढायचे आहे. मात्र, आलेले उत्पादन विक्री केल्यानंतर चांगला भाव मिळेलच असे नाही. शेतकऱ्यांना चार पैसे मिळावेत, यासाठी शासन काही निर्णय घेते. मात्र, त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली तरच शेतकऱ्यांना चार पैसे मिळतात. यापैकीच एक म्हणजे शेतमाल तारण योजना. खरीप व रबी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण असेल तर अपेक्षितपेक्षा अधिक उत्पादन होते. याशिवाय अशा वेळी पेरणी क्षेत्रातही वाढ होत असते.
साहजिकच अधिक उत्पादन आल्यामुळे मागणीत घट होते व बाजारातील विक्री दरात घसरण होते. मात्र, शेतकऱ्यांना पैश्याची गरज असल्यास ते आपला माल तारण ठेवू शकता; परंतु मागील तीन वर्षांपासून पर्जन्यमानात सातत्य नसल्याने ही योजना कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे अधिक उत्पादन झाले असेल तर बाजारात भाव कमी होतात.
अशा वेळी शेतकरी शेतमाल तारण कर्ज योजनेचा आधार घेतात. मात्र, अपेक्षित उत्पादन होत नाही, हमीभावापेक्षा अधिक दर शेतीमालाला मिळतोय. त्यामुळे बाजार समित्या व शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे शेतमाल तारण सध्या तरी ठेवला जात नसल्याचे माहिती गंगापूर व लासुर बाजार समिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
पतीच्या व्यवसायाला पत्नीचे पाठबळ; कष्टाने दिली यशाची उंच झेप
७५ टक्क्यांपर्यंतच रक्कम तारण कर्ज
बाजार समित्यांशिवाय शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही माल तारण ठेवता येतो. ज्वारी, बाजरी, मका व गहू तारण कर्जावर ६ टक्के दराने आधारभूत किंमत किवा बाजारातील प्रचलित भाव यापैकी कमी असलेल्या किमतीनुसार होणाऱ्या एकूण रकमेच्या ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम तारण कर्ज म्हणून देता येते.
या कारणामुळे योजना ठेवावी लागली गुंडाळून
बाजारात शेतमालाचे भाव गडगडल्याने बाजार समितीत शेतीमाल ठेवून त्यावर कर्ज देण्याची तरतूद आहे. या घेतलेल्या कर्जाला अल्पसे व्याजही भरावे लागते. बाजारात दर वाढले की त्याची विक्री करता येते. विक्रीसाठीच धान्य नसल्याने तालुक्यातील लासूर स्टेशन व गंगापूर या दोन्ही बाजार समितीत शेतीमाल तारण ठेवण्याची योजना गुंडाळून ठेवावी लागली आहे.