Join us

किसान एक्स्पोला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 9:43 AM

किसान एक्स्पोत कृषि विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर मिळाली.

पुणे : पुणे येथील किसान एक्स्पोला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर मिळाली. शिवाय अनेक शेतकऱ्यांनी नावनोंदणी करत योजनांचा लाभही घेतला. 

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या किसान एक्सपोला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून आजच्या शेवटच्या दिवशी देखील शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. शेतीसाठी आवश्यक असलेल्या बारीकसारीक गोष्टीपासून मोठमोठ्या यांत्रिकी साधने एक्सपोत उपलब्ध करून देण्यात आल्याने शेतकऱ्यांना या सर्व माहितीसह शेतकऱ्यांना लागणाऱ्या आवश्यक बाबी खरेदी करण्याकडे कल असल्याचे पाहायला मिळाला. विशेषतः महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर शेती पिके, अवजारे शिवाय कृषी उद्योग आदी विगाभाच्या योजना एकाच छताखाली असल्याचे दिसून आले. 

किसान एक्स्पोमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून शेतीसाठी अवजार योजना, फळबाग लागवड योजना, स्मार्ट शेतीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना योजनेची माहिती व्हावी, यासाठी प्रत्येक स्टॉलवर बॅनर स्वरूपात माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योजना काय आहे याविषयी माहिती मिळत आहे. शिवाय कृषी विभागाच्या योजनेच्या माध्यमातून  शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला किंवा स्मार्ट शेती केली असल्यास अशा शेतकऱ्यांच्या यशोगाथा देखील लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी शेतीत नवे प्रयोग केले असल्यास  देखील डिस्प्ले वर लावण्यात आले आहेत. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना आपल्या शेतीतही नवा प्रयोग करावा असे वाटत असल्याचे दिसून आले. 

योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन 

दरम्यान किसान एक्स्पोमध्ये लाखो शेतकऱ्यांनी हजेरी लावली. या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवसांपासून शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या स्टॉलवर भेट दिली. शिवाय विविध योजनांची माहिती घेत आपल्या शेतीसाठी कशा या योजना पूरक असणार आहेत, हे देखील समजून घेतले. शिवाय कृषी विभागाच्या योजनांच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांनी कसे शेतीत नवे प्रयोग करत प्रगती साधली, हे देखील कृषी विभागकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे प्रदर्शनाला आलेल्या हजारो शेतकऱ्यांनी कृषी योजना शेतीसाठी महत्वाच्या असल्याचे सांगत लाभ घेणार असल्याचे सांगितले. 

टॅग्स :शेतीपुणेशेती क्षेत्र