Lokmat Agro >शेतशिवार > कृषी सल्ला: मराठवाड्यात २७ जूलैपर्यंत असा असेल पाऊस; त्यानुसार करा शेतीचे व्यवस्थापन

कृषी सल्ला: मराठवाड्यात २७ जूलैपर्यंत असा असेल पाऊस; त्यानुसार करा शेतीचे व्यवस्थापन

Agriculture Advisory: Rainfall in Marathwada; Manage the farm accordingly | कृषी सल्ला: मराठवाड्यात २७ जूलैपर्यंत असा असेल पाऊस; त्यानुसार करा शेतीचे व्यवस्थापन

कृषी सल्ला: मराठवाड्यात २७ जूलैपर्यंत असा असेल पाऊस; त्यानुसार करा शेतीचे व्यवस्थापन

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 20 ते 24 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानुसार या आठवड्याचा कृषी व्यवस्थापन सल्ला.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 20 ते 24 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानुसार या आठवड्याचा कृषी व्यवस्थापन सल्ला.

शेअर :

Join us
Join usNext

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 21 ते 27 जूलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 23 ते 29 जूलै 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी, किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे. 

मराठवाडयात मागील 16 दिवसात ज्या तालूक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास (परभणी जिल्हा : गंगाखेड, सेलू ; जालना जिल्हा : बदनापूर, मंठा ; हिंगोली जिल्हा : औंढा नागनाथ,हिंगोली ; बीड जिल्हा : धारूर, परळी वैजनाथ, पाटोदा, वडवणी) शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.

पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाला असल्यास सूर्यफुल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तूर (4:2), बाजरी + तूर (3:3), एरंडी, कारळ आणि तिळ, एरंडी + धने, एरंडी + तूर ही पिके घ्यावीत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन असे करा

पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या कापूस पिकात विरळणी व तूट भरून काढणे ही कामे करून घ्यावीत. कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या तूर,  मुग/उडीद, भूईमूग व मका पिकात विरळणी व नांग्या भरणे ही कामे करून घ्यावीत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नवीन केळी, आंबा, सिताफळ लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. केळी, आंबा, सिताफळ व द्राक्ष बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे. द्राक्ष बागेतील फुटवे काढावेत. बागेत पानांची विरळणी करावी. बागेत आर्द्रता वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.

भाजीपाला सल्ला

पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

पाऊस झालेल्या ठिकाणी  जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी.  काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयात ढगाळ व दमट वातावरणामूळे बाह्य परोपजिवी उदा. माशा, पिसवा, डास यांचा प्रादूर्भाव वाढतो. याच्या व्यवस्थापनासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या साहाय्याने उपाययोजना कराव्यात. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.  

ईतर

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात. कापूस व सोयाबीन या सारख्या पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.

(सौजन्‍य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Web Title: Agriculture Advisory: Rainfall in Marathwada; Manage the farm accordingly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.