Pune : "महाराष्ट्र राज्य सोयाबीन, साखर, कापूस, केळी, द्राक्षाच्या उत्पादनात अग्रेसर आहे, केवळ उत्पादनच नाही तर निर्यातीमध्येही महाराष्ट्र पुढे आहे. तर आपल्याला पिके घेण्याच्या पद्धती बदलल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला कमी वेळेत जास्त उत्पादन मिळू शकते" असे महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले. शेतकऱ्यांच्या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. (Agriculture Award Distribution Ceremony)
सन २०२०, २०२१ आणि २०२२ सालच्या कृषी पुरस्काराचे वितरण काल सायंकाळी मुंबईतील वरळी येथील एन. एस. सी. आय डोम येथे करण्यात आले होते. तीन वर्षातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून विविध पुरस्कारांची घोषणा केली जाते. पण मागील तीनही वर्षांमधील पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला नव्हता. काल राज्यातील तीनही वर्षातील विजेत्या ४४८ शेतकऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
काय म्हणाले राज्यपाल?पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या आधी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील कामासंदर्भात गौरवोद्गार काढले. "महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे जिथे पीएम किसान योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना ६ हजार रूपयांचा हप्ता दिला जातो. पावसाळ्याच्या हंगामात शेतकऱ्यांना अनुदान देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. पीक विम्यामध्ये महाराष्ट्राची प्रणाली वाखाणण्याजोगी आहे. वाऱ्यामुळे एका शेतकऱ्याच्या केळी जरी पडल्या तरी त्याला पीकविमा मिळतो हे कौतुकास्पद आहे. सिंचनामध्ये सर्वांत अग्रेसर असणारे राज्य हे महाराष्ट्र आहे. जगात असं एकही राज्य नाही, जिथे केवळ १ रूपयांत शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळतो." अशा शब्दांत राज्यपालाने महाराष्ट्राच्या कृषी कार्याचा उल्लेख केला.
वितरणावरून गोंधळराज्यपालाच्या हस्ते महत्त्वाच्या पुरस्कार विजेत्यांना वैयक्तिकरित्या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार होते. तर काही पुरस्कारांसाठी पाच विजेत्यांचा एकाच वेळी सन्मान केला जाणार होता. त्यामुळे काहीवेळ सभागृहात शेतकऱ्यांनी गोंधळ करत कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला. पण राज्यपालांच्या कानावर ही गोष्ट घातल्यावर प्रत्येक विजेत्या शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यासाठी राज्यपालाने सहमती दर्शवल्यानंतर शेतकरी शांत झाले. भाषणातही मी प्रत्येक शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन त्यांच्यासोबत फोटो काढेन असं राज्यपाल म्हणाले.