Pune Agriculture Awards : राज्यातील मागील तीन वर्षांतील कृषी क्षेत्रातील विविध पुरस्कार वितरण सोहळ्याला अखेर मुहूर्त मिळाला आहे. २९ सप्टेंबर रोजी मुंबई येते पीक स्पर्धेतील विजेते शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील विविध पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांना पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. यामध्ये साधारण ४०० पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी सरकारने ८ कोटी १० लाखांचा निधी मंजूर केला आहे.
दरम्यान, २०२०, २०२१ आणि २०२२ या वर्षांच्या विविध कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी ७ कोटी १५ लाख ६१ हजार रूपये आणि २०२३-२४ सालच्या खरीप हंगामातील पीकस्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांच्या बक्षिसासाठी ९५ लाख ५ हजार रूपये असे एकूण ८ कोटी १० लाख ६६ हजार रूपये खर्च करण्यसााठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. हा निधी आयुक्तालय आणि जिल्हास्तरावरून वितरित केला जाणार आहे.
https://x.com/dhananjay_munde/status/1836329193979974050
शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतीमधील उत्पादनात वाढ होण्यासाठी राज्य सरकारकडून विविध पातळीवर पुरस्कारांची आणि पीक स्पर्धेची घोषणा करण्यात येते. त्यामध्ये कृषी, संलग्न क्षेत्र आणि फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात येतो. यामध्ये कृषीरत्न, कृषीभूषण, सेंद्रीय शेतीतील कृषीभूषण, शेतीमित्र, युवा शेतकरी, उद्यानपंडित, शेतीनिष्ठ, कृषी सेवारत्न असे पुरस्कार देण्यात येतात.
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन मुळे मागील काही वर्षांमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा झाला नव्हता. त्यानंतर मागील तीन वर्षांचे म्हणजे २०२० ते २०२२ सालापर्यंतच्या तीन वर्षांचे कृषी पुरस्कार आणि पीकस्पर्धेतील विजेत्यांना पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या पुरस्कारामध्ये रोख बक्षिसे आणि सन्मानचिन्हाचा सामावेश असतो. तर २९ सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी राज्य सरकारने ८ कोटी १० लाखांचा निधी मंजूर केला आहे.