पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'चे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात पार पडले. यानिमित्ताने नवीन अवजारे शेड याचे भूमिपूजन व नूतनीकरण केलेला मुक्त संचार गोठा व नवीन पर्यावरण नियंत्रित गोठ्याचे उद्घाटनही करण्यात आले.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा आणि राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांतकुमार पाटील यांनी आपले मत मांडले. या केंद्रामध्ये देशातील पहिले गो पर्यटन केंद्र सुरु करण्यात येणार असून यासाठी मदत करण्यासाठी मी नेहमी तत्पर असेन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. त्याबरोबरच या माध्यमातून देशी गायींचे संवर्धन व संशोधन होण्यास मदत होईल, शेण-गोमुत्रापासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू आणि दुधापासून प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार केल्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असं मत त्यांनी व्यक्त केले.
राज्यभरातील ५००० पेक्षा अधिक गोशाळांना भेटी देऊन त्याच्या आधारे देशी गाय संवर्धनासाठी जी-१० व्हिजन डॉक्युमेंट आम्ही प्रस्तावित केले आहे. यामध्ये प्रामुख्याने गो संवर्धन, गो संशोधन, गो संरक्षण, गो सेवा, गोमय प्रक्रिया, गो मूल्यवर्धन, गोशाळा, गो शेती, गो टुरिझम, गो साक्षरता असे उपक्रम राबविले जाणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे गो पर्यटन (काऊ टुरिझम) केंद्र सुरू करण्यास आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.
याप्रसंगी राज्याच्या गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. प्रशांतकुमार पाटील, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (कृषी परिषद), पुणे चे उपाध्यक्ष तुषार पवार, कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, विद्यापीठाचे अभियंता मिलिंद ढोके, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने व या प्रकल्पाचे तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कंखरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पल्लवी सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. धीरज कंखरे यांनी केले.