Join us

Sugar Factory : साखर व संलग्न उद्योगांची पुण्यात होतेय परिषद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 10:59 AM

Sugar Industries : कृषी महाविद्यालय पुणे येथे साखर आणि संलग्न उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तर या कार्यक्रमासाठी साखर उद्योगातील तज्ज्ञ मंडळींनी उपस्थिती लावली आहे.

Sugar and Allied Industrial summit 2024  : जमिनीचं आरोग्य चांगलं टिकवलं तर आपली अर्थव्यवस्था चांगली चालेल हा उद्देश समोर ठेवून शेतकऱ्यांना जागृत करणे आणि जमिनीत सेंद्रीय कर्ब वाढवण्याच्या दृष्टीने कृषी महाविद्यालय प्रयत्नशील असते. तर साखर आणि पूरक व्यवसायाला चालना मिळावी यासाठी साखर व संलग्न उद्योग परिषदेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, कृषी महाविद्यालय पुणे, मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनीअरिंग सर्विसेस लि. पुणे, साखर आयुक्तालय पुणे, दि एन्व्हायरमेंट असोशिएशन ऑफ महाराष्ट्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालय पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. तर यावेळी कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू प्रशांतकुमार पाटील, साखर आयुक्त कुणाल खेमनार, पर्यावरण मुल्यांकन समितीचे चेअरमन दिपक म्हैसकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य सचिव आविनाश ढाकणे हे उपस्थित होते. तर कृषी महाविद्यालय पुणेचे सहयोगी प्राध्यापक धर्मेंद्रकुमार फाळके आणि मिटकॉनचे संदीप जाधव हे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.

साखर कारखाने, पूरक व्यवसाय आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती, जागतिक हवामान बदल आणि धोरणनिश्चिती यासंदर्भात जागृत करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.. यावेळी कृषी महाविद्यालयाने काही साखर कारखान्यांसोबत सामंजस्य करार केले आहेत. 

साखर उद्योगातील चक्रीय अर्थव्यवस्था, पर्यावरणपूरक व शाश्वत उस उत्पादन वाढीसाठी नव जमीन आरोग्यासाठी ऊस शेतीतील व साखऱ  कारखान्यांतील टाकाऊ पदार्थांचे मूलस्थानी व्यवस्थापन यासंदर्भात मार्गदर्शन होणार आहे. त्याचबरोबर मोलॅसेसपासून पोटॅश निर्मितीः डिस्टीलरी लिक्वीट वेस्टमधून मीठ पुनर्प्राप्ती, कार्बन फुटप्रिंट, ग्रीन केमिस्ट्री आणि कार्बनडायऑक्साईड व्हॅलोरायझेशन यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रऊससाखर कारखाने