Pune : राज्याच्या निवडणुका पार पडल्यानंतर एकाच महिन्यात पुन्हा राज्याच्या कृषी आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. सध्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची कृषी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून कृषी आयुक्त रविंद्र बनवडे यांची नोंदणी महानिरिक्षक पदावर बदली करण्यात आली आहे. पण मागच्या सव्वा ते दीड वर्षाच्या कालखंडात राज्याला पाच वेगवेगळे कृषी आयुक्त मिळाले आहेत.
दरम्यान, नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुनिल चव्हाण यांची कृषी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये चव्हाण यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आणि त्यांच्या जागी डॉ. प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण गेडाम यांनाही केवळ अडीच ते तीन महिनेच काम करता आले. त्यानंतर त्यांची बदली नाशिकच्या विभागीय आयुक्त पदावर करण्यात आली.
मधल्या काळात काही दिवस कृषी विभागाला आयुक्त नव्हते. माध्यमांतून टीका झाल्याने महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे यांना कृषी आयुक्त पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला होता. पुढे जून २०२४ मध्ये राज्याला तत्कालीन महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्या रूपाने पूर्णवेळ कृषी आयुक्त मिळाले.
त्यांच्या नियुक्तीनंतर सहाच महिन्यात त्यांची बदली करण्यात आली असून आता शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची कृषी आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात बिनवडे हे कार्यालयीन प्रशिक्षणासाठी परराज्यात गेले असताना रावसाहेब भागडे यांनी अतिरिक्त कारभार सांभाळला आहे. भागडे यांनी साधारण चार वेळा कृषी आयुक्तपदाचा अतिरिक्त कारभार सांभाळला आहे.
मागच्या सव्वा वर्षात राज्याला पाच कृषी आयुक्त मिळाले असून यामुळे कृषीचा कारभार सुरळीत कसा चालेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात ज्याप्रमाणे मागच्या पाच वर्षांत चार कृषीमंत्री मिळाले त्याप्रमाणेच प्रत्येक मंत्री आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची कृषीच्या आयुक्तपदी नियुक्ती करतो, त्यामुळेच कारभार विस्कळीत होतो असा आरोप केला जात आहे.