Join us

Agriculture Commissioner : राज्याला नव्या कृषी आयुक्तांची प्रतीक्षा; विद्यमान आयुक्तांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 7:39 PM

कृषी आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांची नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे : खरीप हंगाम तोंडावर आला असताना आणि पेरण्यांच्या कामाची लगबग सुरू असताना राज्याचे कृषी आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. सध्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांची बदली नाशिकच्या विभागीय आयुक्त पदावर करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन खरिपात कृषी आयुक्तपद रिकामे झाले आहे. 

दरम्यान, मागच्या सात महिन्यापूर्वीच प्रविण गेडाम यांची कृषी आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती. धडाडीचे अधिकारी म्हणून त्यांची राज्यभर ओळख असून त्यांनी हॉर्वर्ड विद्यापीठातून सार्वजनिक आरोग्य या विषयावर एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या अभ्यासानंतर त्यांची कृषी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.

गेडाम हे २००२ सालच्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक घोटाळे उघडकीस आणले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंतची त्यांची कारकिर्द वादळी ठरली असून सात महिने कृषी आयुक्त पदावर काम केल्यानंतर आता त्यांची नाशिक येथे बदली केली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची नियुक्ती केली असल्याच्या चर्चा सध्या माध्यमांमध्ये सुरू आहेत. 

दरम्यान, मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये राज्याला स्थिर कृषी मंत्री मिळाले नाहीत. सध्याचे कृषीमंत्री शेतीप्रश्नावर बोलतानाही दिसत नाहीत. त्याचबरोबर कृषी आयुक्तांचीही वारंवार बदली केल्यामुळे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरणारे ठोस निर्णय घेण्यास अडचणी येत आहेत. तर सध्या ऐन खरिपाच्या तोंडावर राज्यभर बियाणांचा तुटवडा असताना राज्य सरकारने कृषी आयुक्तांची बदली केली आहे. त्यामुळे आता राज्यात नवे कृषी आयुक्त कधी आणि कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्र