पुणे : ऐन खरिपामध्ये राज्याच्या कृषी विभागामध्ये बदल्यांचे सत्र चालू आहे. डॉ. प्रविण गेडाम यांच्या तडकाफडकी बदलीनंतर अखेर राज्याला पूर्णवेळ कृषी आयुक्त मिळाले आहेत. रविंद्र बिनवडे यांची कृषी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून ते आता पूर्णवेळ कृषी विभागाची सूत्रे सांभाळणार आहेत.
दरम्यान, डॉ. प्रविण गेडाम यांनी कृषी आयुक्तालयातील भ्रष्टाचाराला आळा घातल्यामुळे त्यांची तडकाफडकी बदली केल्याचं बोललं जातंय. त्यांची नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर राज्याकडे पूर्णवेळ कृषी आयुक्त नव्हते. त्यामुळे शासनाने तात्पुरत्या स्वरूपात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भेगडे यांच्याकडे आयुक्तालयाचा कार्यभार दिला होता.
त्यानंतर सध्या पुणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत असलेले रविंद्र बिनवडे यांची कृषी आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. तर ऐन खरिपात सुरू असलेल्या आयुक्तांच्या बदल्यांच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.