Pune : राज्याच्या नव्या कृषीमंत्र्यांनी कृषी विभागाची आढावा बैठक दोन दिवसांपूर्वी घेतली. यामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर लगेच शेतमालाच्या बाजार व्यवस्थापनाचे अचूक नियोजन करणेबाबत राज्यस्तरीय समन्वय समितीची आढावा बैठक आज (दि. ६) रोजी पार पडली. प्रभारी कृषी आयुक्त रावसाहेब भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक साखर संकुल येथे पार पडली.
दरम्यान, शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमतींपेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी होणार नाही याची खबरदारी कृषी पणन मंडळाने कटाक्षाने घ्यावी. ‘एमएसपी’पेक्षा कमी दराने खरेदी झाल्यास पणन मंडळाकडून काय कारवाई करण्यात येते याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा, अशा सूचना कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांनी यावेळी दिल्या.
एमएसपी व प्रत्यक्ष बाजारभाव यांचे सनियंत्रण करण्यासाठीची यंत्रणा जिल्हा व तालुका पातळीवर सक्रिय असावी, अशी अपेक्षा श्री. भागडे यांनी व्यक्त केली. तसेच शेतमाल खरेदी विक्रीसाठी ई-नाम प्रणालीचा प्रभावीपणे वापर झाल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यासाठी होईल असे प्रतिपादन श्री. भागडे यांनी केले. याशिवाय विविध विषयांवर सखोल आढावा व चर्चा संपन्न झाली.
स्मार्ट प्रकल्पातील ‘प्रकल्प अंमलबजावणी कक्ष- कृषी’अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाअंतर्गत विविध शेतमालांचे साप्ताहिक बाजारभाव अहवाल व संभाव्य किंमतींचे अहवाल तयार करण्यात येतात. तसेच, स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत हे अहवाल शेतकरी व सीबीओंच्या सर्व भागधारकांपर्यंत पोचविण्यासाठी मोबाईल ऍप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. स्मार्ट प्रकल्पातील सहभागी सीबीओ व शेतकऱ्यांमध्ये बाजारभावासंबंधी जागरुकता निर्माण करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल एमएसपी पेक्षा कमी दराने खरेदी होत असल्यास शेतकरी बांधवांनी त्यांच्याशी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांना संपर्क साधावा, असे आवाहन कृषी आयुक्त श्री. रावसाहेब भागडे यांनी केले आहे.
सदर आढावा बैठकीदरम्यान सोयाबीन, कापूस व मका पिकांच्या वार्षिक पुनरावलोकन अहवाल पुस्तिकांचे विमोचन कृषी आयुक्त व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील शेती व फळपीक परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेऊन किफायतशीर शेतीसाठी शेतकऱ्यांना सल्ला देणे, तसेच शासनास वेळोवेळी शेती व फळांचे उत्पादन, आवक व दरांबद्दल माहिती देणे व उपाययोजना सुचविणे यासाठी शेतमालाच्या बाजार व्यवस्थापनाचे अचूक नियोजन करणेबाबत सदर राज्यस्तरीय समन्वय समिती नेमण्यात आलेली आहे.
या बैठकीसाठी व्यवस्थापकीय संचालक, फलोत्पादन औषधी वनस्पती मंडळ श्री. सुनील महिंद्रकर, आत्मा यंत्रणेचे कृषी संचालक तथा प्रमुख, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष- कृषी (स्मार्ट प्रकल्प) श्री. अशोक किरनळ्ळी, कृषी संचालक (नियोजन) विनयकुमार आवटे, विस्तार व प्रशिक्षण कृषी सहसंचालक डॉ. मेघना केळकर, सल्लागार श्री. अरुण कुलकर्णी, श्री. श्रीकांत कुवळेकर यांच्यासह बाळासाहेब ठाकरे कृषीव्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्पाचे प्रमुख कृषी अधिकारी, राज्यातील कृषी विद्यापीठांचे कृषी अर्थशास्त्र विभागांचे प्रमुख प्राध्यापक, पणन मंडळ, नाफेडचे अधिकारी उपस्थित होते.