महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त सोमवार (दि.०१) कृषि विभाग व पंचायत समितीनांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीनांदगाव येथे कृषि दिन म्हणून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास उपस्थित असलेले तालुका अॅग्रो डिलर असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी पंचायत समिती नांदगाव गटविकास अधिकारी प्रदिप दळवी, तालुका कृषी अधिकारी नांदगाव रविंद्र डमाळे, कृषी अधिकारी पंचायत समिती सुरेश चौधरी, कृषि विस्तार अधिकारी पंचायत समिती भट्टुलाल वाघ, कृषि अधिकारी संजय गोसावी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून या कार्यक्रमास सुरुवात झाली.
त्यानतंर तालुका कृषी अधिकारी नांदगाव रविंद्र डमाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ज्यात डॉ पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंती दिनानिमित्त दि. १७ जून ते १ जुलै २०२४ या कालावधीत कृषि विभागामार्फत सुरू असलेल्या नांदगाव तालुक्यात कृषि संजीवनी पंधरवडा कार्यक्रमाची सांगता कृषि दिनाचे औचित्य साधून करण्यात येत असल्याचे संगितले. तसेच त्यांनी वसंतराव नाईक यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मार्गदर्शन केले.
त्यानंतर गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तसेच जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना शेतकऱ्यांचा बांधापर्यंत व तळागाळातील जनतेपर्यंत पोहच होतील यादृष्टीने काम करावे असे आवाहन केले.
तदनंतर बाळासाहेब कवडे यांनी शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्याचा प्रसार शेतकऱ्यांपर्यंत कसा होईल याबाबत प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच नांदगाव तालुक्यातील भाजीपाला व मिश्र पीक पध्दतीचा अवलंब करणारे मांडवड येथील प्रयोगशील शेतकरी नंदकिशोर आहेर व कांदाचाळीतील साठवणूक तंत्रज्ञान विकसित केलेले गंगाधरी येथील सुभाष जाधव यांचा उपस्थित मान्यवरांचे हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कृषि पर्यवेक्षक नायडोंगरी राजेंद्र काळे यांनी तर आभार सुरेश चौधरी कृषि अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांनी व्यक्त केले.