Farmers Crop Advice : राज्यभरातील पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकऱ्यांचे पीक आता वाढीच्या अवस्थेत आहेत. तर वाढीच्या अवस्थेत असताना पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच आपल्या पिकांची काळजी घेणे गरजेचे असते. तर येणाऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्यासाठी काय करावे यासंदर्भात कृषी शास्त्रज्ञांनी पीक सल्ला दिला आहे.
हा सल्ला पिकांना रोगांच्या प्रादुर्भावापासून वाचवण्यास फायद्याचा ठरणार आहे. तर खाली दिलेल्या प्रमाणानुसार फवारणी केल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांवर रोगाचे नियंत्रण करून उत्पादनात वाढ करता येणार आहे.
१. कोकण विदर्भात बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही प्रमाणात उघडीप मिळण्याची शक्यता.
२. ढगाळ हवामानामुळे भातावर बुरशीजन्य करपा नियंत्रणासाठी ट्रायसायक्लोझोल 75 टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी १० ग्रॅम प्रति १० लिटर फवारावी.
३. तुरीच्या लागवडीनंतर ४५ दिवसांनी वरून ५ सेंटीमीटर अंतरावर शेंडे खुडणी करावी.
४. सोयाबीन/कापूस पिकात मर रोग साठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (50 डब्ल्यू पी) २.५ ग्रॅम किंवा कार्बनडाझिम (50 डब्ल्यू पी) २ ग्रॅम + युरिया १० ग्रॅम+ पांढरे पोटॅश १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
५. तुर पीक पिवळे पडल्यास ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड -२ ,५० ग्रॅम किंवा ५०मिली अधिक १९:१९:१९ खत १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
६. मूग व उडीद पिकात भुरी रोगाची लागण दिसताच डीनोकॉप १० मिली किंवा गंधक ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
माहिती संदर्भ - कृषी विभाग