Agriculture Department : कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटील हे ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या पदावर कुणाची वर्णी लागणार याकडे पाहावे लागणार आहे. अद्याप निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकपदावर कुणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
दरम्यान, विकास पाटील यांची २०२३ मध्ये विस्तार व प्रशिक्षण संचालक पदावरून निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली होती. अचानक झालेल्या बदलीमुळे चर्चांना उधाण आलं होतं. कारण निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकपद हे आयुक्तालयातील सर्वांत महत्त्वाच्या पदापैकी एक आहे.
निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक पदावर राज्यातील सर्व खते, औषधे व बियाणे कंपन्यांचे लक्ष असते. खते, बियाणे, औषधे बनवण्याचा व विक्रीचा परवाना याच विभागाकडून मिळवावा लागतो. त्यामुळे या कंपन्यांसाठी हे खाते खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे या पदावर कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याची वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सध्या कृषी विभागातील निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकपद, मृदा संधारण संचालकपद, प्रक्रिया व नियोजन संचालकपदे रिक्त आहेत. प्रक्रिया व नियोजनसाठी सुनिल बोरकर आणि मृद संधारणसाठी रफिक नाईकवाडी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या कृषी आयुक्तालयातील तीन संचालकपदे रिक्त आहेत.