maharashtra Agriculture : राज्याच्या कृषी विभागात मागील काही दिवसांपासून पूर्णवेळ संचालकपदे रिकामे होते. जुने संचालक निवृ्त्त झाल्यानंतर त्यांच्या जागी नव्या संचालकांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. पण राज्य सरकारने शासन आदेश काढत नव्या संचालकांच्या नियक्त्या केल्यामुळे राज्याला नवे कृषी संचालक मिळाले आहेत.
प्रक्रिया व नियोजन विभागाचे संचालक सुभाष नागरे आणि गुणनियंत्रण संचालक विकास पाटील निवृत्त झाल्यानंतर या विभागाला पूर्णवेळ संचालक नेमलेले नव्हते. राज्य सरकारने आता निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक पदी विस्तार व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक सुनील बोरकर यांची नियुक्ती केली आहे.
कृषी आयुक्तालयाच्या फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाचे नवे संचालक हे किसन मुळे हे असणार आहेत. ते अगोदर अमरावती येथे विभागीय कृषी सहसंचालक म्हणून कामकाज पाहत होते. अशोक किरन्नळी यांनी आता आत्माच्या संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती देण्यात आली आहे. तर पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी यांना विस्तार व प्रशिक्षण या विभागाच्या संचालक पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
सध्याचे विस्तार व प्रशिक्षण संचालकपदी असलेले विनयकुमार आवटे यांची बदली कृषी आयुक्तालयातील कृषी प्रक्रिया व नियोजन संचालकपदी करण्यात आली आहे. तर नव्याने गुणनियंत्रण संचालकपदावर नियुक्त झालेले सुनिल बोरकर यांनी अनेक याआधी गुणवत्ता नियंत्रण अधिकारी म्हणून काम केले आहे. त्या अनुभवामुळे त्यांना गुणनियंत्रण विभागाचे संचालकपद देण्यात आले आहे.